मुंबईत कोविड कालावधीत झालेल्या कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखाने ऑक्सिजन प्लँट प्रकरणी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिवाय आता ईडीसुद्धा या प्रकरणाचा तपास करणार आहे.
कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती उद्योजक रोमीन छेडा याला अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे. छेडा आणि त्यांच्या कंपनीला पात्रता नसतानाही कंत्राट मिळाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेला ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी छेडा यांना मदत केल्याचा आरोप आहे.
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसापूर्वी ऑक्सिजन प्लँट घोटाळ्याच्या संदर्भात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास करत रोमिन छेडा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्व प्रकरणात गैरप्रकार झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रोमिन यांना अटक करत पुढील कारवाई सुरू केली. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पूर्णपणे तपास करत असून छेडा यांच्या कंपनीच्या माध्यमातून काही शेल कंपनींना पैसेसुद्धा ट्रान्सफर केले गेले असल्याचं समोर आलं आहे. त्याचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
अजित पवार निर्मित ‘बिनपैशाचा तमाशा’ सिझन-२
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला सात महिने ठेवले ओलीस!
मुंबईत ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनचे आयोजन!
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने अमेरिकेत रचला इतिहास!
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात ३० दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने कोणताही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट मिळवले. असे असूनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी छेडा यांच्याशी संगनमताने ते कंत्राट तर या कंपनीला दिलेच, पण प्लँट उभारणीला विलंब झाल्याने दंड देखील कमी आकारला. यामुळे पालिकेचे ६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच अनेक ऑक्सिजन अभावी काही बळी देखील गेले.