सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी वारंवार समन्स बजावूनही हुलकावणी देणारे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता झाले आहेत. पुन्हा एकदा ते कुठे आहेत, याची कुणालाही माहिती नाही. ईडीने त्यांना समन्स पाठविण्याची ही चौथी वेळ आहे. पण पुन्हा एकदा ते या चौकशीला गैरहजर राहिले आहेत आणि ते नेमके कुठे आहेत हे कुणालाही ठाऊक नाही.
अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याची आम्हाला माहिती नाही. बहुतेक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते आमच्याकडे चौकशीसाठी येतील, असे ईडीचं म्हणणे आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
मागे ईडीने समन्स बजावले तेव्हाही अनिल देशमुख उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी एका व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती, पण ते कुठे आहेत हे कळले नव्हते.
आम्हाला अनिल देशमुख यांच्याशी संपर्क करता आलेला नाही. त्यांचा नेमका ठावठिकाणा आम्हाला ज्ञात नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहात आहोत. न्यायालयाच्या आदेशांनंतर तरी अनिल देशमुख चौकशीमध्ये सहकार्य करतील, असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.
ईडीनं अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. सोमवारी म्हणजेच २ ऑगस्ट रोजी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारीदेखील अनिल देशमुख हजर न राहिल्यामुळे आता ईडीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
हे ही वाचा:
‘या’मुळे जम्मू ते श्रीनगर प्रवास होणार सुलभ
अफगाणिस्तानात शांतीसेना जाणार?
उंटाच्या चालीने चालणारी एसटी पाहिलीत का?
बापरे! …यासाठी मुलींनी दडवून ठेवला वडिलांचा मृतदेह
अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीमध्ये जर न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली, तर मात्र ईडीसमोर हजर होण्याशिवाय अनिल देशमुखांकडे पर्याय उरणार नाही.