बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अभिनेता रणबीर कपूर याला ईडीने समन्स बजावले असून त्याची लवकरच चौकशी केली जाऊ शकते. ऑनलाईन गेमिंग प्रकरणात रणबीर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकार आणि गायक सध्या ईडीच्या रडारवर आहेत. रणबीर कपूर या महादेव गेमिंग ऍपचे जाहिरातीमधून प्रमोशन करत होता. तसेच या माध्यमातून त्याने मोठी रक्कम कमावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावले आहे.
या ऍपचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर याला मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाली होती असा दावा करण्यात आला आहे. महादेव ऍपचे संस्थापक असे चार ते पाच ऍप्स चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील ऍपचे कॉल सेंटर आहे. श्रीलंका, नेपाळ, यूएईमध्ये ऍपचे कॉल सेंटर आहेत. ईडीच्या समन्सनुसार ६ ऑक्टोबर रोजी रणबीर याची चौकशी होण्याची शक्यता आहे. यावर अद्याप रणबीरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा:
शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सुमोटो याचिका दाखल
नेमबाजीने दिली सर्वाधिक सुवर्णपदके
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अमृतकाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे मंत्रालयात प्रकाशन!
प्रकरण काय?
बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीमध्ये ईडीने ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे.