ईडीच्या रडारवर आलेल्या शिवसेनेच्या नेत्यांपैकी अनिल परब आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर ईडीने यवतमाळ -वाशीम येथील शिवसेना खासदार भावना गवळी यांना समन्स पाठवले आहे. सोमवारी त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. भावना गवळी यांच्या एका कंपनीचे संचालक सईद खान यांना नुकतीच अटक केली आहे.
मागील महिन्यात यवतमाळ – वाशीम येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित ५ ठिकाणी ईडीने छापेमारी केल्यानंतर सोमवारी गवळी यांच्या एका कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीने अटक केली. त्यापाठोपाठ भावना गवळी यांना बुधवारी ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. या समन्समध्ये सोमवारी (४ऑक्टोबर) रोजी भावना गवळी यांना ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
भावना गवळी यांच्या काही संस्थामध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ईडीकडे आलेल्या तक्रारी प्रकरणी ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात संचालक सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात चौकशीसाठी भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पालिका कर्मचारीच मागत होता फेरीवाल्यांकडून १०-१० रुपये…वाचा!
कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; कळव्यातली धक्कादायक घटना
‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह’ आता काँग्रेसचे घोषवाक्य असेल
…असा उठवला सीएने आपल्या नावाचा फायदा! वाचा…
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.