बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन हिला ईडीने समन्स बजावले आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी हे समन्स देण्यात आले असून आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समन्स देऊन ऐश्वर्याला आता दिल्लीत बोलावण्यात आले होते. ‘टीव्ही ९’ने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने आता स्थगिती मागितली असून तिला हजर होण्यासाठी नवीन तारीख दिली जाण्याची शक्यता आहे.
पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर ईडीने या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे ५०० लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे.
यूकेमध्ये पनामा- आधारित लॉ फर्मचे २०१६ मध्ये ११.५ कोटी कागदपत्रे लीक झाले होते. त्यानंतर या प्रकरणात जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
धक्कदायक! पती बरा व्हावा म्हणून सहा महिन्याच्या नातीचा दिला बळी
तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त
हेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा
तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!
कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे १९९३ ते १९९७ या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. या कंपन्यांचे भांडवल ५ ते ५० हजार डॉलर्स दाखविण्यात आले होते. मात्र, यावर अमिताभ बच्चन यांनी आपला या कंपन्यांशी संबंध नसून परदेशात खर्च केलेल्या पैशांवरील सर्व कर भरलेला आहे, असे स्पष्ट केले होते.
चार कंपन्यांपैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलँडमध्ये होती. ऐश्वर्याला एका कंपनीची संचालिका बनवण्यात आलं होतं. नंतर तिला कंपनीची शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आले. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील, आई आणि भाऊ हे देखील कंपनीत भागीदार होते.