मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणात ईडीने विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी बुधवार, २१ जून रोजी ईडीने मुंबईत आणि पुण्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती असलेल्या लोकांवर १५ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. ईडीच्या छापेमारीमुळे उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, ईडीकडून या प्रकरणी गुरुवार, २२ जून रोजी सकाळीही दोन बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळीच पालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या निवासस्थानी धाड टाकली आहे. दोघांच्याही घरात कसून चौकशी केली जात आहे. प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे. हे दोन्ही अधिकारी अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचा थेट कोविड टेंडर प्रक्रियेशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने केलेल्या या छापेमारीनंतर खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काल ईडीने पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी छापेमारी केली होती. तर, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या घरी आणि आदित्य ठाकरे यांचे खास सहकारी सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानीही ईडीने छापे टाकले होते. ईडीने सुरज चव्हाण यांच्या घरी सकाळी साधारण ९ वाजता छापेमारी केली होती. ही छापेमारी रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल साडे सोळा तास ईडीने ही छापेमारी केली.
हे ही वाचा:
पाटण्यातील बैठकीपूर्वी विरोधकांना दणका, एचएएमचे जीतन राम मांझींचा भाजपाला पाठींबा
…आणि पोलीस ठाण्याचे बँक खाते बँक कर्मचाऱ्यानेच केले साफ
राज्यातील साडेतीन लाख युवक-युवतींना मिळणार ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ !
लाखो वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण
सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला बेकायदेशीर कंत्राट देण्यात आलं होतं. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले होते. टेंडर प्रक्रियेत पालिकेतील अधिकाऱ्याचा सहभाग होता का? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेतील अजून काही अधिकारी ईडीच्या रडारवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.