कोलकाता आरजी कार हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी कोलकाता येथील चार ठिकाणी छापे टाकले आहेत. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या दोन फ्लॅट्सचाही यात समावेश आहे. यापूर्वीही ईडीने माजी प्राचार्य संदीप घोष आणि त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली होती.
गुरुवारी ईडीने लेकटाऊन आणि तळा परिसरात छापे टाकल्याची माहिती आहे. या भागात वैद्यकीय साहित्य पुरवठादाराचे कार्यालय आणि आरजी कार हॉस्पिटलला औषधांचा पुरवठा करणाऱ्या वैद्यकीय पुरवठा विक्रेत्याचे निवासस्थान आहे. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालमधील हावडा, सोनारपूर आणि हुगळी येथील अनेक ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर या नव्या ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी, केंद्रीय तपास संस्थेने आरजी कार मेडिकल कॉलेजमधील कथित आर्थिक अनियमिततेविरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला ज्यात डॉ. घोष यांचे नाव होते.
हे ही वाचा :
राहुल गांधींच्या शीखांवरील वक्तव्याविरोधात दिल्लीत आंदोलन !
बेकायदेशीर असेल तर मशिदी, मदरसेही पाडले पाहिजेत!
गणेशमूर्तींच्या विटंबनेसाठी केला मुलांचा वापर !
कोलकात्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या तपासादरम्यान माजी संदीप घोष यांचे सदस्यत्वही निलंबित केले. यापूर्वी २६ ऑगस्ट रोजी सीबीआयने संस्थेतील महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या तपासाचा भाग म्हणून डॉ. घोष यांच्यावर पॉलीग्राफ चाचणीची दुसरी फेरी पूर्ण केली होती. उच्च न्यायालयाने सीबीआयला तपासाचा अहवाल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला असून तो १७ सप्टेंबर रोजी सादर होणार आहे.