सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला. दिल्लीतील मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी खासदार सिंह यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणीही शोधमोहीम राबवण्यात आली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील एक व्हिडीओ जाहीर केला आहे. त्यामध्ये ईडीचे पथक संजय सिंह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाल्याचे दिसते आहे. दिल्लीतील मद्यघोटाळ्याप्रकरणी दाखल आरोपपत्रात सिंह यांचे नाव नमूद करण्यात आले आहे.
मंगळवारी दिल्ली न्यायालयाने वायएसआर काँग्रेस पक्षाचे लोकसभा खासदार मंगुटा श्रीनिवासुलू रेड्डी यांचा मुलगा राघव मागुंटा आणि दिल्लीतील व्यापारी दिनेश अरोरा यांना कथित दिल्ली दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सरकारी साक्षीदार होण्यास परवानगी दिली. अरोरा हे आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे जवळचे सहकारी मानले जातात. सिसोदिया हे मद्य धोरण प्रकरणात आरोपी आहेत आणि त्यांना ईडी तसेच सीबीआयने अटक केली आहे.
हे ही वाचा:
नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!
बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी
ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू
अभिनेता विवेक ऑबेरॉयची केली दीड कोटींची फसवणूक; एकाला अटक
मद्यधोरण प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केली होती. त्यानंतर हे मद्यधोरण रद्द करण्यात आले होते. दिल्ली सरकारच्या सन २०२१-२२च्या मद्य धोरणात परवान्यासाठी लाच देणाऱ्या काही विक्रेत्यांना अनुकूल निर्णय दिल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे.