आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून ईडीने सोमवार, २ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. अमानतुल्ला खान यांच्या बाटला हाऊसमधील घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे. वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहचल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी अमानतुल्ला यांचीही चौकशी करत आहेत.
आमदार अमानतुल्ला यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या घरावरील कारवाईची माहिती दिली आहे. सकाळी ७ वाजता ईडीचे लोक घरी आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. ईडीचे लोक सर्च वॉरंटच्या नावावर अटक करायला आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ईडीच्या सर्व नोटिसांना उत्तर दिले असून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत, असं अमानतुल्ला यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाची तुलना तरी होईल का?
विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई
अर्णब गोस्वामीप्रमाणे बंगालमध्येही पत्रकाराची मुस्कटदाबी?
बांगलादेश: हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहेत राजीनामे !
अमानतुल्ला खान विरुद्ध ईडीचा खटला २०१८ ते २०२२ दरम्यान बेकायदेशीररीत्या कर्मचाऱ्यांची भरती आणि वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर अन्यायकारकपणे भाडेतत्त्वावर दिल्याच्या आरोपांवर आधारित आहे. याचा परिणाम म्हणजे बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा त्यांना झाला आहे. ईडीने या प्रकरणा संदर्भात अमानतुल्ला खान यांची १२ तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती. ईडीने दावा केला आहे की, या बेकायदेशीर कृत्यांमधून अमानतुल्ला यांनी मोठी रक्कम मिळवली असून यातून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, दिल्ली उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांकडून वारंवार समन्स चुकवल्याचा दाखला देत मार्चमध्ये अमानतुल्ला खान यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण नाकारले होते.