अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने जहाज बांधणी क्षेत्रातील एबीजी शिपयार्ड कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. या कंपनीच्या मुंबई, सुरत आणि पुणेसह २६ कार्यालयांवर मंगळवार, २६ एप्रिल रोजी धाडी टाकल्या आहेत. २८ प्रमुख बॅंकांकडून तब्बल २२ हजार ८४२ कोटींचे कर्ज घेऊन, हे पैसे १०० बनावट कंपन्यांद्वारे फिरवून त्यातून वैयक्तिक मालमत्ता निर्माण केल्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
२८ बॅंकांच्या एकत्रित गटाने एबीजी कंपनीला सन २००५ ते २०१२ या कालावधीमध्ये २२ हजार ८४२ रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, कंपनीच्या अध्यक्षांनी आणि अन्य संचालकांनी कर्जापोटी प्राप्त झालेली ही रक्कम १०० बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देशात आणि परदेशात फिरवत वैयक्तीक मालमत्ता खरेदी केली.
मनी लाँडरिंगसंबधीच्या ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत ईडीकडून ही तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी ‘सीबीआय’ने फेब्रुवारी महिन्यात बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कर्जापैकी किती रक्कम कुठे व कशी वळवली, या बनावट कंपन्या कशा स्थापन केल्या, त्यात कोणत्या संचालकाची काय भूमिका होती, याचा तपास सुरु आहे.
हे ही वाचा:
अजबच!! अजानच्या वेळेला घरात स्पीकर लावल्याबद्दल पोलिसांत तक्रार
एकाच वेळी ७८ हजार २०० तिरंगा फडकवून भारताने केला विश्वविक्रम
अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाचा विचार गुंडाळला!
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
या तपासासाठी ईडीने मुंबई, सुरत आणि पुणेसह २६ कार्यालयांवर धाडी टाकल्या. यात २४ ठिकाणे ही मुंबईतील आहेत. एबीजी शिपयार्ड या कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहे. देशातील सर्वात मोठी खासगी जहाज बांधणी कंपनी, अशी या कंपनीची ओळख होती. नुकतेच कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे.