नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त

मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत.

नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त

मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्याबाबत ईडीने आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. यामध्ये मुंबईतील तीन फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील १४७ एकर जमिनीचा समावेश आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर सोबत नवाब मलिक यांनी व्यवहार केला असल्याचा आरोप मलिकांवर आहे. याप्रकरणी ईडीने कारवाई करत फेब्रुवारीमध्ये नवाब मलिकांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली होती. नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची पुष्टी न्यायनिर्णय प्राधिकरणाने नुकतीच केली आहे.

त्यानुसार ईडीने नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेतजमिनीचा समावेश आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन रीयुनाईट’ची यशस्वी कामगिरी

भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण

ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…

वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३

नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत असून सध्या ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, सरदार खान यांच्यामदतीने नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील दोषींसह कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये एका महिलेची तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे हडप करण्याच्या गुन्हेगारी कटात भाग घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Exit mobile version