तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

१५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली

तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

तमिळनाडूतील एका सरकारी कर्मचाऱ्याकडून २० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी एका ईडी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अंकित तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर ईडीच्या मदुराई येथील कार्यालयात दिंदीगुल जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून शोधमोहीम सुरू केली आहे.

 

अंकित तिवारी याला तमिळनाडूच्या दिंडिगुल जिल्ह्यातील एका सरकारी कर्मचाऱ्याकडून २० लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. तिवारी याच्या घरातही शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणी मदुराई आणि चेन्नईमधील आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असे तपासात आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंकित तिवारी अनेकांना धमकावून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेत होता. तसेच, लाचेची रक्कम अन्य ईडी अधिकाऱ्यांमध्येही वाटत होता, असा आरोप आहे. त्याच्याकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. तसेच, या प्रकरणाशी संबंधित मदुराई आणि चेन्नईतील ईडी अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

२९ ऑक्टोबर रोजी अंकित तिवारी याने दिंडिगुल येथील एका सरकारी कर्मचाऱ्याशी संपर्क साधला होता. दिंडिगुलच्या दक्षता आणि लाचलुचपत विभागाकडे या कर्मचाऱ्याविरुद्ध दाखल असलेले एक प्रकरण बंद करण्यात आले आहे. मात्र अंकित तिवारी याने या प्रकरणाचा तपास ईडीने हाती घ्यावा, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी करावे

२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक

महुआंच्या चौकशीचा अहवाल ४ डिसेंबरला लोकसभेत सादर होणार

मुंबईत ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनचे आयोजन!

या प्रकरणासाठी त्याला मदुराई येथील ईडी कार्यालयात ३० ऑक्टोबर रोजी बोलावले होते. जेव्हा हा कर्मचारी तिथे पोहोचला, तेव्हा तिवारी याने तपास बंद करण्यासाठी ३ कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. तसेच, त्याने आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून ५१ लाखांत हे प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर मांडला होता. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी या कर्मचाऱ्याने २० लाखांची रक्कम ईडी अधिकाऱ्याला दिली. तसेच, लवकरात लवकर पूर्ण रक्कम न दिल्यास कठोर कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्याने ३० नोव्हेंबर रोजी दिंडिगुलच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी १ डिसेंबर रोजी, २० लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना अंकित तिवारी याला अटक करण्यात आली.

Exit mobile version