मद्य धोरण योजेनातील आरोपीकडून लाच घेणाऱ्या ईडी अधिकाऱ्याला अटक

पवन खत्री यांना आगाऊ रक्कम म्हणून ५० लाख रुपये दिले होते

मद्य धोरण योजेनातील आरोपीकडून लाच घेणाऱ्या ईडी अधिकाऱ्याला अटक

दिल्ली मद्य धोरण योजनेतील आरोपी अमनदीप सिंग धल याच्याकडून पाच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहायक संचालक पवन खत्री यांना अटक केली. ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात लाचखोरीची तक्रार ईडीनेच दाखल केली होती.

 

 

ईडीच्या विनंतीवरून सीबीआयने सहायक संचालक पवन खत्री आणि उच्च विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, अटक करण्यात आलेला व्यापारी अमनदीप सिंग धल्ल, गुरुग्रामचे रहिवासी बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेल्सचे सीईओ विक्रमादित्य आणि काही इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

 

अमनदीप सिंग धल आणि बिरेंदर पाल सिंग यांनी दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासात मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान प्रवीण वत्स यांना पाच कोटी रुपये दिले होते. प्रवीण वत्स यांनी ईडीला सांगितले की, दीपक सांगवान यांनी अमनदीप धल यांना काही रकमेच्या बदल्यात अटकेपासून संरक्षणाची व्यवस्था करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सांगवानने डिसेंबर २०२२मध्ये ईडीचे अधिकारी पवन खत्री यांच्याशी वत्सची ओळख करून दिली.

 

 

दीपक सांगवानच्या आश्वासनाच्या आधारे, प्रवीण वत्स यांनी अमनदीप धल यांच्याकडून डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत सहा टप्प्यांत प्रत्येकी ५० लाख रुपये अशाप्रकारे तीन कोटी रुपये घेतले. दीपक सांगवान यांनी नंतर वत्स यांना सांगितले की, दोन कोटी रुपये अतिरिक्त दिल्यास अमनदीप सिंग धल यांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले जाऊ शकते. प्रवीण वत्स यांनी तसे अमनदीप ढाल यांना कळवले आणि धल यांनी हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर सांगवान यांनी वत्सकडून चार टप्प्यांत प्रत्येकी ५० लाख रुपये घेतले, अशी माहिती प्रवीण वत्स यांनी दिली.

 

हे ही वाचा:

ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरिता २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित

काश्मीरमध्ये रंगणार ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा!

आशिया चषकावर भारतीय महिला हॉकी संघाने कोरले नाव

१५ जानेवारी हा राज्याचा क्रीडा दिन तर शिवछत्रपती पुरस्काराची रक्कम वाढली

ईडीने सांगितले की, अमनदीप सिंग धल्लच्या वडिलांकडून मिळालेल्या रकमेपैकी त्यांनी दीपक सांगवान आणि पवन खत्री यांना आगाऊ रक्कम म्हणून ५० लाख रुपये दिले होते. हे पैसे रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात आले. डिसेंबर २०२२मध्ये वसंत विहार येथील आयटीसी हॉटेलच्या मागे पार्किंगच्या जागेत हे पैसे हस्तांतरित करण्यात आले. तथापि, सांगवान यांनी आश्वासन देऊनही, अमनदीप धल्ल यांना ईडीने १ मार्च २०२३ रोजी अटक केली. अटकेनंतर प्रवीण वत्स यांनी दीपक सांगवान यांची भेट घेतली. यावर सांगवान यांनी अटकेच्या सूचना उच्च अधिकार्‍यांकडून आल्या आहेत आणि ते त्यांच्यावर दबाव आणू शकत नाहीत, असे वत्स यांना सांगितले.

 

 

दीपक सांगवान यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात अधिकाऱ्यांना सांगितले की, जूनमध्ये त्यांनी प्रवीणची भेट घेऊन धल यांच्या कुटुंबाकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करण्याची मागणी केली होती. या बैठकांना ईडीचे दोन अधिकारी पवन खत्री आणि नितेश कोहर हेदेखील उपस्थित होते. अबकारी धोरण घोटाळ्याच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ईडीच्या काही अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि नंतर या प्रकरणातील आरोपी, ईडीच्या संशयित अधिकाऱ्यांच्या घराची झडती घेण्यात आली.

 

 

प्रवीण वत्स यांच्या घरातून दोन कोटी १९ लाख रुपये रोख आणि एक कोटी ९४ लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये होते. ईडीने प्रवीण वत्सच्या घरातून दोन आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत.

 

 

तपास एजन्सीने या प्रकरणातील इतर आरोपींच्या घरातून इतर आक्षेपार्ह पुरावेही जप्त केले आहेत. त्यातील दोन आरोपी ईडी अधिकारी उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याची चौकशी करणार्‍या पथकाचा भाग नव्हते. त्यांनी अमनदीप सिंग धल यांच्याकडून ३० कोटी रुपये उकळण्याची योजना आखली होती. ईडीच्या आदेशानुसार एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयने आरोपींशी संबंधित असलेल्या परिसराचीही झडती घेतली.

Exit mobile version