ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीने दुसरं समन्स पाठविले आहे. करोना काळात मुंबई महापलिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकर हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनंही त्यांची याप्रकरणात चौकशी केली होती.
करोना काळात मुंबई महापलिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकरांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना समन्स पाठवून ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही त्यांना २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलवले होते. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण याच्यासोबत अमोल कीर्तीकर यांचे नाव समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलवले आहे.
काही दिवसांपूर्वी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. गेल्या चौकशीला अमोल किर्तीकर चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कीर्तीकर गैरहजर असल्याची माहिती त्यावेळी त्यांचे वकील दिलीप साटलेंनी दिली होती. ईडीने अत्यंत शॉर्ट नोटीस देउन समन्स दिल्यानं, हजर होण्यात अडचण होत असल्याचं कीर्तीकरांनी पत्रात नमूद केलं होतं.
हे ही वाचा:
डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा
२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार
वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका
बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक
प्रकरण काय?
मुंबई महानगरपालिकेत करोना काळात मोठमोठे गैरव्यवहार आणि घोटाळे झाल्याची बाब उघडकीस आली होती. महापालिकेतील बॉडी बॅग घोटाळाही चर्चेत आहे. अशातच खिचडी घोटाळाही समोर आला आहे. गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट काही कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले होते. सुरुवातीच्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आलं होतं, असं महापालिकेचे म्हणणं आहे. पण, यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.