मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणात आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीसंदर्भात केलेल्या आरोपांबाबत सध्या ताब्यात असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे याची आज रविवारी ईडीकडून चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
तळोजा येथील तुरुंगात जाऊन सक्तवसुली संचालनालयाकडून ही चौकशी केली जाणार आहे. शनिवारी वाझेची ईडीकडून तब्बल ६ तास चौकशी करण्यात आल्याचे बोलले जात होते, पण प्रत्यक्षात तशी चौकशी झाली नाही. रविवारी मात्र ही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्ष पदावर जाधवांचा डोळा, पण काँग्रेसने फिरवला बोळा
सहकार क्षेत्र पिंजून काढण्यास अमित शहांनी केली सुरुवात
गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा विशेष गाड्या सोडा!
ईदसाठी भिवंडीतले कत्तलखाने पुन्हा सक्रिय? दोन गायी चोरल्याची घटना
१०० कोटी वसुली प्रकरणी ईडीकडून सचिन वाजे कडे चौकशी करून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
आज रविवारीदेखील वाझेकडे चौकशीसाठी ईडीचे अधिकारी तळोजा तुरुंगात जाणार आहेत. एनआयए न्यायालयाने वाझेच्या चौकशीसाठी ईडीला तीन दिवसांची परवानगी दिली आहे.
सोमवारी ईडीच्या चौकशीचा शेवटचा दिवस असणार आहे. वाझेच्या चौकशीदरम्यान घेण्यात येणाऱ्या जबाबामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपांनुसार ‘ईडी’ ने पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहायक कुंदन शिंदे व संजीव पालांडे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या चौकशीसाठी ‘ईडी’ला न्यायालयाने परवानगी दिली आहे.
१०० कोटी रुपयांच्या खंडणीपैकी जवळपास ४० ते ५० कोटी रुपयांची गोळा झाली होती, असा ‘ईडी’चा संशय आहे. या ५० कोटींपैकी ४.७० कोटी रुपयांच्या रक्कमेची नेमकी माहिती ‘ईडी’च्या हाती आहे. ही रक्कम अनिल देशमुख यांच्या नातेवाईकांनी बनावट कंपन्यांत गुंतविण्यात आली असल्याचेही कागदपत्रे ‘ईडी’कडे आहेत.