शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुन्हा एकदा कोलकत्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जी यांच्या बेलघरिया येथील दुसऱ्या घरातून सुमारे २९ कोटी रोख आणि ५ किलो सोन्याचे घबाड मिळाले आहे. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे दहा तास लागले. विशेष म्हणजे मुखर्जी यांनी हे पैसे शौचालयात लपवले होते.
बुधवार, २७ जुलैला ईडीने शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकत्यात तीन ठिकाणी छापेमारी केली होती. दक्षिण कोलकत्यातील राजदंगा आणि बेलघरिया येथे ईडीने छापे टाकले होते. यावेळी अर्पिता मुखर्जी यांच्या बेलघरियातील दुसऱ्या घरी २८ कोटी ९० लाख रोख रक्कम आणि ५ किलो सोने मिळाले. मुखर्जी यांनी ही रक्कम घरातील शौचालयात लपवून ठेवली होती. अर्पिता मुखर्जी यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान या संपत्तीचा खुलासा केला होता.
शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ईडीने नुकतेच पश्चिम बंगालमधील ममता बनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. अर्पिता मुखर्जी या पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. पाच दिवसांपूर्वीच ईडीने अर्पिता यांच्या घरातून २० कोटी रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्यासह परकीय चलन जप्त केले होते. त्याचवेळी अर्पिता यांना ईडीने अटक केली होती. आतापर्यंत अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ५० कोटी मिळाले आहेत.
हे ही वाचा:
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा सर्वाधिक लाभार्थी!
वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार
बुधवारी ईडीला रोख मोजण्यासाठी तीन नोटा मोजण्याचे यंत्र आणावे लागले. रोख रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे दहा तास लागले. तसेच मुखर्जी यांच्या दुसऱ्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर विरोधी पक्ष पार्थ चॅटर्जी यांना टीएमसीच्या मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करत आहेत.