म्हाडा परीक्षेतही डमी उमेदवार बसविण्यात आल्याचा प्रकार

म्हाडा परीक्षेतही डमी उमेदवार बसविण्यात आल्याचा प्रकार

पोलिस भरतीपाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षेमध्येही डमी उमेदवार बसविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लेखी परीक्षेदरम्यान पवई येथील परीक्षा केंद्रावर उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार बसल्याचे टीसीएस कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार मूळ उमेदवार आणि डमी उमेदवार या दोघांविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डमी उमेदवाराकडून पोलिसांनी चिप असलेले एक इलेकट्रॉनिक उपकरण हस्तगत केले आहे.

पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आलेली म्हाडा सरळसेवा भरतीची परीक्षा मुंबई आणि उपनगरात ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. एकूण १४ तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदांकरिता घेण्यात येणाऱ्या या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीला देण्यात आली होती.

पवई येथील ओरम आयटी पार्क परीक्षा केंद्रावर टीसीएसच्या वतीने असलेल्या केंद्रप्रमुखाला एका उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार बसला असल्याचा संशय आला. त्यांनी ही बाब म्हाडाच्या उपअभियंत्याच्या निदर्शनास आणून दिली. सर्वांनी मिळून या उमेदवाराची झडती घेतली असता त्याच्याकडे चेतन बेलदार या उमेदवाराच्या नावे असलेल्या प्रवेश प्रक्रिया, आधार कार्ड, वाहन चालक परवाना तसेच एक इलेक्ट्रॉनिक उपकरण सापडले. याबाबत या डमी उमेदवाराला हटकले असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच आपण दुसऱ्या उमेदवारासाठी परीक्षा देत असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे ३८ जवान नदीत वाहून गेल्याचे उघड

राहुल गांधीची ‘राष्ट्र’ विरोधी भेदनीति

असा असणार ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’

रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार, राज ठाकरे यांनीही घेतले दर्शन

 

चेतन बेलदार हा जळगाव येथील तरुण असून तो मूळ उमेदवार आहे. त्याच्या वतीने औरंगाबाद येथील गणेश सतावण हा तरुण परीक्षा देण्यासाठी बसला होता. परीक्षा उत्तीर्ण झाल्यास चेतनकडून पैसे मिळणार होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पवई पोलिसांनी या माहितीच्या आधारे चेतन आणि गणेश या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version