म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार

गाडीचे केले नुकसान

म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार

कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री एका कंत्राटदारावर झालेला गोळीबार हा ‘म्हाडा टेंडर’च्या वादातून झाल्याचे  पोलिसांच्या तपासात समोर आले आहे, अद्याप या प्रकरणी  हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली नसून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

दहिसर पूर्व येथे राहणारे सरकारी कंत्राटदार सुरजप्रताप सिंग देवडा (३२) यांच्यावर सोमवारी रात्री कुर्ला पश्चिम येथील कपाडिया नगर येथे दोन अनोळखी इसमांपैकी एकाने गोळीबार केला तर दुसऱ्याने कंत्राटदार याच्या मोटारी समोर येऊन मोटारीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पिस्तुलातून झाडलेली गोळी सुरजसिंग याच्या मोटारीला लागल्यामुळे सूरज सिंग हे थोडक्यात बचावले. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात सुरजसिंग यांनी तक्रार दाखल केली असून या तक्रारीत घाटकोपर परिसरात राहणारे समीर सावंत आणि गणेश चुग्गल या दोघांची नावे घेतली आहे.

सुरजसिंग यांनी पोलिसाना दिलेल्या जबाबात दिलेली माहिती अशी की, सुरजसिंग  यांची धरम कन्स्ट्रक्शन नावाची  कंपनी  आहे, त्याची कंपनी सरकारी कामाचे  कंत्राटे घेते. सुरजसिंग यांच्या कंपनीने नुकतेच म्हाडाच्या कामाचे एक टेंडर भरले आहे. वांद्रे ते दहिसर दरम्यान पायवाट, फुटपाथ आणि नाले बनविण्याचे कामाचे ४५ कोटींचे टेंडर भरले आहे. हे टेंडर मागे घ्यावे  म्हणून १५ दिवसापूर्वी समीर सावंत आणि गणेश चुगल या दोघांनी कंत्राटदार सुरज प्रताप सिंग देवडा यांना फोनवर धमकी दिली होती, मात्र देवडा यांनी त्याच्या धमकीला भीक घातली नाही.

हे ही वाचा:

द काश्मीर फाइल्स, मी वसंतराव ऑस्करच्या यादीत

…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

विराट भन्नाट… श्रीलंकेविरुद्ध ठोकले वनडेतील ४५ वे शतक

तामिळनाडूमध्ये ३५६ कलम लागू करा! सोशल मीडियावर #Article 356 हा ट्रेंड

सोमवारी दुपारी कंत्राटदार सुरजसिंग हे मित्र पंकज हे दोघे त्याच्या मोटारीतून कुर्ला पश्चिम येथील महानगर पालिकेच्या एल कार्यालयात आले होते, काम आटोपून घरी जात असताना रात्री  कपाडिया नगर येथे दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटार अडवून त्याच्या मोटारीवर  गोळी झाडली. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात  समीर सावंत आणि गणेश चुगल आणि दोन अनोळखी हल्लेखोर असे एकूण चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती कुर्ला पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र होवाळे यांनी दिली.

म्हाडा च्या कामाचे टेंडर १२ कंत्राटदार यांनी भरले आहे, त्या पैकी धरम कन्स्ट्रक्शन ही एक कंपनी आहे. या १२ कंपन्यांपैकी अनेक कंपन्या बाद झालेल्या असून  ४ ते ५ कंपन्यापैकी धरम कन्स्ट्रक्शन कंपनीला हे टेंडर मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे धरम कंस्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट मिळू नये म्हणून काही जण प्रयत्नात आहे असा आरोप स्वतः सुरजसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या वादातून समीर सावंत आणि गणेश चुगल यांनी धमकी देऊन माझ्यावर हल्ला करण्यासाठी भाडोत्री गुंड पाठवल्याचा आरोप सुरजसिंग यांनी केला आहे.

Exit mobile version