वाराणसीच्या एका २० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत ताशी १२० किमी वेगाने गाडी चालवून वडोदरा येथे चार जणांना उडविल्याची घटना घडली. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रक्षित चौरसिया असे या तरुणाचे नाव असून तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्याने ताशी १२० किमी वेगाने गाडी चालवली आणि रस्त्यावरील चार जणांना उडविले. त्याच रस्त्यावरून स्कूटर चालविणाऱ्या एका महिलेलाही त्याने फरफटत नेले. त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला होता पण गाडीच्या बाहेर येऊन तो दारूच्या नशेत आरडाओरडा करू लागला. काळ्या टीशर्टमध्ये असलेला हा तरूण गाडीच्या बाहेर पडून ‘आणखी एकदा’ असे म्हणत असल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा:
इंझमाम उल हक म्हणतो, आयपीएलवर बहिष्कार टाका!
बंगाल भर्ती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जींचे जावई बनले माफीचे साक्षीदार
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
भारताने उपटले पाकिस्तानचे कान!
अपघात झाल्यानंतर त्या चालकाच्या शेजारी बसलेला मित चौहान हा दरवाजा उघडून बाहेर पडला आणि आपण हे कृत्य केलेले नाही तर चालकानेच ते केले आहे, असे लोकांना सांगायला सुरुवात केली. त्याने स्कूटर चालवणाऱ्या ज्या महिलेला उडवले, तिचे नाव हिमानी पटेल असल्याचे समजले आहे. होळीचे रंग आणण्यासाठी हिमानी आपल्या लहान मुलीसोबत स्कूटरवरून जात होती. तेव्हाच हा अपघात घडला. तिचा जागीच मृत्यू झाला असून त्या छोट्या मुलीसह तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी पन्ना मोमाया यांनी सांगितले की, करेलीबाग मध्ये हा अपघात घडला. त्या कारचालकाने अतिशय वेगाने ती गाडी चालवली आणि रस्त्यात मध्ये येणाऱ्यांना उडवले. एका महिलेचा त्यात मृत्यू झाला असून चार जणांवर उपचार सुरू आहेत. आम्ही एफआयआर दाखल केला असून सीसीटीव्ही फूटेज पाहणार आहोत.
त्या चालकासह सापडलेला मित चौहान याचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यानेही मद्यप्राशन केले होते का, याची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, चालक चौरसियाककडे वाहन परवाना होता.