अंमली पदार्थांच्या तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पर्दाफाश करत डोंगरी येथून तिघांना अटक केली आहे. एनसीबीने ३१ किलो मेफेड्रोन आणि ६९ लाख रोख जप्त केले.
मुंबईतील एक सिंडिकेट अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी चौकशी सुरू केली आणि त्यांना आढळले की डोंगरी येथील एक मुशर्रफ जेके हा ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होता.
बुधवारी अधिकाऱ्यांनी नागपाडा परिसरात सापळा रचून अमली पदार्थाची खेप पोहचविण्यासाठी आलेल्या मुशर्रफला ताब्यात घेण्यात आले, त्याच्या झडती दरम्यान त्याच्या जवळून १० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले, असे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मुशर्रफच्या चौकशीत त्याने नौशीन नावाच्या एका महिलेकडे अमली पदार्थाचा साठा ठेवला असल्याची माहिती एनसीबीच्या चौकशीत समोर आली. दरम्यान एनसीबीच्या अधिकारी यांनी डोंगरी येथे छापा टाकून १० किलो एमडी आणि ६९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे, तसेच एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होणार
अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरमध्ये हायटेक उपकरणांसह कमांडो, स्नायपर
मुंबईत सायलेन्सर, प्रेशर हॉर्न ‘रोडरोलर’ खाली चिरडले
अर्थसंकल्पात बळीराजाला दिलासा; कृषी पंपांचे वीज बिल माफ आणि होणार अखंडित वीज पुरवठा
दरम्यान वडाळा येथून सैफ याला अटक करण्यात आली, सैफ हा अमली पदार्थाची डिलीव्हरी करण्यासाठी आला होता, गुरुवारी त्याला अटक करून त्याच्या जवळून ११ किलो मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतील ड्रग्सचे हे मोठे सिंडिकेट आहे, अनेक वर्षांपासून हे अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये कार्यरत होते आणि मुंबई, ठाणे, नवीमुंबई सारख्या शहरामध्ये ड्रग्स पुरवठा करीत होते अशी माहिती एनसीबीने दिली आहे.