महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची आज इतर गोष्टीमुळे वेगळीच ओळख निर्माण होत आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील बारमध्ये ड्रग्सचे सेवन होत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते. पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. मात्र, अशी प्रकरणे पुन्हा समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी कारवाई करत कात्रज परिसरातून २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले दोघेही राजस्थानचे रहिवासी असल्याची माहिती आहे. कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी दोन तरुण आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून ड्रग्जची विक्री करणाऱ्या राजस्थानमधील दोन तरुणांना अटक केली.
हे ही वाचा:
उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी
इराणमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हनीयेह ठार
अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १४५ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू
श्रवणसिंग बलवंतसिंग राजपूत (२२, राजस्थान) आणि महेश पुनाराम बिश्नोई (२०, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यांच्याकडून २१ लाख ३८ हजार रुपयांचे १०६ ग्रॅम मेफेड्रोनसह व दुचाकी असा २२ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे दोघे सध्या खराडी परिसरातील तुळजाभवानीनगरमध्ये राहतात.
अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.