मुंबईतील कुख्यात ड्रग्स माफिया बेबी पाटणकर सह दोन जणांविरुद्ध एका व्यवसायिकाची सोनं देण्याच्या नावाखाली दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस हवालदारासह शशिकला पाटणकर उर्फ बेबी हिच्यासह अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बेबी पाटणकर आणि पोलीस हवालदार यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी बेबी पाटणकर आणि हवालदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन (म्यावम्याव) जप्त करण्यात आले होते.
वरळीतील आंबेडकर नगर झोपडपट्टीत राहणारी बेबी पाटणकर ही मुंबईतील अमली पदार्थचा धंदा करीत होती. अटकेनंतर बेबी पाटणकर ही ड्रग्स माफिया क्वीन म्हणून कुप्रसिद्धीच्या झोतात आली होती.
बेबी पाटणकर ही ड्रग्स माफिया पुन्हा एकदा एका फसवणुकीच्या प्रकरणात चर्चेत आली आहे.
गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरीट सुरेश चव्हाण (६१) असे तक्रारदाराचे नाव असून तो रुनिचा फ्रेंच फॉरवर्डचा मालक आहे. चव्हाण यांची कंपनी कस्टम क्लिअरन्सचे काम देते. चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, त्यांनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी त्यांनी आपल्या काही मित्रांना या क्षेत्राशी संबंधित लोकांना संपर्क करण्यास सांगितले होते.
ऑक्टोबर २०२१ मध्ये देवकुमार रॉय नावाच्या चव्हाण यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांची सुनीता चौधरी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली. चौधरी यांनी चव्हाण यांची परशुराम रामकिशन मुंढे नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. मुंढे यांनी चव्हाण यांना सांगितले की ते मेसर्स आरआरएम गोल्ड ट्रेडिंग कंपनीचे संचालक आहेत आणि त्यांची कंपनी सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते.
मुंढे याने चव्हाण यांना वरळी नाक्याजवळील भिवंडीवाला चाळीतील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत सोने दाखवण्यासाठी बोलावले आणि तेथे शशिकला रमेश पाटणकर उर्फ बेबी यांच्याशी ओळख करून दिली. बेबीकडे पाच किलो सोने असल्याचे मुंढे यांनी चव्हाण यांना सांगितले.
चव्हाण यांना तीन किलो सोन्यासाठी १कोटी २७लाख रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी ते सोने घेण्यासाठी गेले असता बेबीने सांगितले की, तुम्ही फक्त तीन किलो सोन्याचे पैसे दिले आहेत आणि उरलेल्या दोन किलोसाठी ८७ लाख रुपये द्या तेव्हाच, मी सोने देईन.चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी ७० लाख रुपयांची व्यवस्था केली आणि पैसे घेऊन ते वरळीतील भिवंडीवाला चाळीत आला. चव्हाण यांनी हे पैसे बेबीला दिले. हे पैसे घेऊन बेबी म्हणाली, थोडा वेळ थांबा, मी सोने घेऊन येते, बराच वेळ चव्हाण आणि मुंढे हे त्या ठिकाणी थांबले परंतु बेबी पाटणकर ही सोने घेऊन आलीच नाही. दरम्यान मुंढे यांनी बेबीला फोन केला असता ती म्हणाली की उद्या झवेरी बाजार येथे ये, मी तुला तेथे सोने देईन. दुसऱ्या दिवशी बेबीने दिलेल्या वेळेनुसार चव्हाण आणि मुंढे झवेरी बाजारला पोहोचले पण ती आली नाही.
हे ही वाचा:
यापुढे उद्धव ठाकरे – कोश्यारींप्रमाणे विमानावरून भांडण होणार नाही!
दहशतवादी मुझफ्फर, फैसल यांना फाशीची शिक्षा
जो बायडेन यांच्या मुलाला ड्रग्जचे व्यसन, बंदूक बाळगण्याचा आरोप
पाकिस्तानचा खेळ संपला; श्रीलंका अंतिम फेरीत
बेबी पाटणकर ही ड्रग्स माफिया असून तिच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळताच चव्हाण यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.चव्हाण यांची तक्रार आणि त्यांनी दिलेले पुरावे तपासल्यानंतर गुन्हे शाखेने शशिकला उर्फ बेबी पाटणकर आणि परशुराम रामकिशन मुंढे यांच्याविरुद्ध कलम ४२० आणि ३४ नुसार एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.