अँटॉप हिल सेक्टर ७ या ठिकाणी असलेल्या एसीपी कार्यालयाच्या पाठीमागे मिळालेल्या मुंडकेविरहित धडाचा छडा लागला आहे. या हत्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) यांच्या वाहनावर असलेल्या पोलीस चालकाला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हे शाखेने मृतदेहाची ओळख पटवलेली असली तरी अद्याप मृताचे मुंडके मिळून आलेले नाही.
शिवशंकर गायकवाड (४५) आणि मोनिका गायकवाड (३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस वाहन चालक आणि त्याच्या पत्नीचे नाव आहे. हे पती पत्नी वरळी पोलीस कॅम्प या ठिकाणी राहण्यास होते. शिवशंकर गायकवाड हा मुंबई पोलीस दलात मोटार वाहन विभागात पोलीस कॉन्स्टेबल असून सायन विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या वाहनावर चालक म्हणून होता.
अँटॉप हिल येथील सेक्टर ७ येथील इमारत क्रमांक ९८ मध्ये एसीपीचे कार्यालय आहे. या इमारतीच्या मागे ३० सप्टेंबर रोजी सकाळी अँटॉप हिल पोलिसांना मुंडके विरहित पुरुषाचा मृतदेह बेडशीट मध्ये गुंडाळलेला सापडला होता. मृतदेहाची ओळख पटत नव्हती. या गुन्ह्याचा संलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष ४ चे पथक करीत होते. एसीपी कार्यालयाच्या मागे मृतदेह मिळून आल्यामुळे पोलिसानी हे प्रकरण गंभीरतेने घेत, परिसरातील मोबाईल टॉवर वरून डम डेटा काढण्यात आला.
गुन्हे शाखेने काढलेल्या डम डेटा तपासत असताना एक मोबाईल क्रमांक सतत पोलिसांना त्या परिसरात ऍक्टिव्ह असल्याचे दाखवत होता. गुन्हे शाखा कक्ष ४च्या पथकाने या मोबाईल क्रमांक डायल केला असता ट्रु कॉलर मध्ये दादा असे नाव आले, मृतदेहाच्या एका हातावर दादा असे गोंधलेले असल्याचे लक्षात येताच पोलिसानी या मोबाईल क्रमांकाची माहिती काढली असता दादा जगदाळे नावाच्या व्यक्तीचा हा मोबाईल क्रमांक असून दादा जगदाळे हा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे राहणारा असल्याचे समोर आले.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेशात भाजपा सत्ता राखणार तर पंजाबमध्ये त्रिशंकू
समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेणारा मोदींसारखा नेता नाही!
शिष्यवृत्तीच नाही, फिजिओथेरपिचे निवासी डॉक्टरही संपावर
गुन्हे शाखेचे एक पथक अक्कलकोट येथे रवाना झाले व दादा जगदाळे याची माहिती काढली असता दादा जगदाळे हा येथील एका मिरचीच्या घाऊक व्यापाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत दादा जगदाळे व्यवसायानिमित्त मुंबई, तसेच इतर शहरात जात असतो अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. कक्ष ४ च्या पथकाने दादा जगदाळे याचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले असता त्यात मोनिका गायकवाड हिचे अनेक कॉल मिळून आले. दरम्यान गुन्हे कक्ष ४ च्या पथकाने मोनिका गायकवाड हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दादा जगदाळे हा मोनिका हिचा लग्नापूर्वीचा मित्र असून दोघांमध्ये अजूनही मैत्री होती अशी माहिती समोर आली. पत्नीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस चालक शिवशंकर गायकवाड याने पत्नीच्या मदतीने त्याला एका ठिकाणी बोलावून त्याची हत्या केली, अशी माहिती तपासात समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या शिवशंकर गायकवाड याने खुनाची कबुली दिली मात्र त्याला कसे मारले, कुठे मारले, त्यांचे मुंडके कुठे टाकले याबाबत काहीही माहिती देत नसल्यामुळे पोलिसांकडून या घटनेचे धागेदोरे जुळविण्यात येत आहेत.