गटारावरील तब्बल १२० किलो वजनाची लोखंडी झाकणे चोरणाऱ्या टोळीतील एकाला चोरलेल्या ९ झाकणासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुलुंड पोलिसांनी केली आहे.
बासू वर्मा (२०) असे अटक करण्यात आलेल्या झाकण चोराचे नाव आहे. या चोराला अमर नगर मुलुंड पश्चिम येथून अटक करण्यात आली आहे. बासू वर्मा हा आपल्या सहकाऱ्यासह मुलुंड निर्मल लाईफ स्टाईल या ठिकाणी असलेल्या नाल्यावरील लोखंडी झाकणे चोरी करून ती भंगारात विकत होते. या टोळीने मागील एका महिन्यात १६ लोखंडी झाकणे चोरी केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली, याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गणेश मोहिते आणि पथकाने सीसीटीव्ही कॅमरेच्या मदतीने या झाकण चोरांचा शोध घेऊन बासू वर्मा याला अटक केली. त्याच्याजवळून ९ झाकणे जप्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत यांच्या दोन गाड्या कुणाच्या?
‘मी ख्रिश्चन आहे, मी तिरंग्याला सलाम करणार नाही’
रश्दी यांच्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
दोन वर्षांपूर्वी अशाच एका टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. तुर्भे रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या गोदामातून रेल्वेकडून गटारांवर टाकण्यात येणारी लोखंडी झाकणे चोरण्याची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोघांना जेरबंद केले होते. या दोघांकडून ५९० किलो वजनाची आठ लोखंडी झाकणे हस्तगत करण्यात आली होती. या गोदामात गटारांवर टाकण्यात येणारी झाकणे बेवारस पडलेली आढळली. आरोपीने ती चोरून विकण्याचा प्रयत्न केला होता.