सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या डोंबिवली शहरात धक्कादायक प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे.
डोंबिवलीच्या भोपर या ठिकाणी राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर ३३ जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने डोंबिवलीतच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. ठाणे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे की, या ३३ जणांपैकी २६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन जण अल्पवयीन आहेत.
आता या बलात्कार करणाऱ्यांची मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून गुरुवारी सायंकाळपर्यत २६ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले २४ आरोपी हे १८ ते २४ वयोगटातील असून इतर दोघे १७ वयोगटातील असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे. २४ आरोपीना कल्याणच्या न्यायालयात हजर कऱण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने २९ सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली असून दोघा अल्पवयीन आरोपींची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृह येथे करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्व येथील भोपर येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. या तरुणाने जानेवारी महिन्यात पीडितेवर एका खोलीत बलात्कार करून बलात्काराचा व्हिडियो मोबाईल फोन मध्ये बनवून मित्राला दाखवला होता. त्या नंतर त्या मित्राने तो व्हिडियो स्वतःच्या मोबाईल मध्ये घेऊन पीडितेला या व्हिडिओच्या माध्यमातून धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकारे हा व्हिडीओ एका कडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्या कडे असे करता करता ३३ जणांनी गैरफायदा उचलत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणावर तिच्यावर बलात्कार केला.
दोन दिवसापूर्वीच देखील पीडितेवर बलात्कार झाल्यामुळे तिला त्याचा त्रास होऊ लागला, तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे आस्थेने चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार आई आणि काकीला सांगितला.
मुलीवर झालेल्या या प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंब हादरले आणि त्यांनी बुधवारी रात्रीच मानपाडा पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिसांनी ताबडतोब मुलीचा जबाब नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. झालेला प्रकार गंभीर असल्यामुळे मानपाडा पोलिसांनी तात्काळ बलात्कार आणि पोक्सो कलमांतर्गत ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्रीतून आरोपीची धरपकड सुरु करण्यात आली. गुरुवारी दुपारपर्यत पोलिसांनी २६ आरोपींना अटक केली असून त्यात दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्त यांनी ताबडतोब विशेष पोलीस पथक (एसआयटी) गठीत केली असून हा तपास एसआयटीकडे देण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या महिला सहाय्यक पोलीस आयुक्त ढोले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
दहाचे नाणे देताना येतायत नाकीनऊ… वाचा!
लस येता घरा, तोचि दिवाळी दसरा; घरोघरी लसीकरणाचा मोदींचा निर्णय
एका वर्षात मुंबईत पकडलेल्या अमलीपदार्थ विक्रेत्यांचा आकडा धक्कादायक
संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?
या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांची भेट घेतली घेऊन आरोपीना सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संतापजनक घटनेचा अनेक राजकीय पक्षाच्या आमदार, नगरसेवक आणि नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.