ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील आंबिवलीमधील इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. मुंबई येथील डीएन नगर पोलीस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी आले असता यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र, या हल्ल्याला न जुमानता पोलिसांनी हल्ला परतवून लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. फिरोज खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंबईतील अंधेरीमध्ये एका व्यक्तीला तोतया पोलिसांनी गंडा घातला होता. ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती. डीएननगर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला होता. त्यातील एक आरोपी फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून तो कल्याण येथील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता.
यावेळी या वस्तीत आधी एक महिला पोलीस बुरखा घालून आली. तिच्यासोबत इतर काही पोलीस देखील होते. त्यानंतर फिरोज याचा शोध सुरू होता. अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला. त्यावेळी या पोलिसांनी वस्ती बाहेर थांबलेल्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांची पोलीस जीप न घेता शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा वापर केला. या कारवाई दरम्यान आरोपीच्या लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावत आरोपीला पळून जाण्याची संधी न देता त्याला इराणी वस्तीतून घेऊन गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज याच्या विरोधात ३५ गुन्हे दाखल आहेत.
हे ही वाचा:
‘मी परत येईन’: भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान ‘टर्मिनेटर’च्या रूपात
सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात
जोहान्सबर्गमधील इमारतीत अग्नितांडव; ६३ जणांचा मृत्यू
८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!
गेल्या २० वर्षापासून या इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. पोलिसांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता.