कल्याण परिसरात एका इमारतीमध्ये मराठी कुटुंबियाला परप्रांतीय व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी गरळ ओकत देशमुख कुटुंबीयांना माराहाण केल्याची घटना घडली असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत हा प्रकार घडला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे या सोसायटीत आजूबाजूला राहतात. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होऊन याचा त्रास वर्षा कळवीकट्टे यांना होऊ लागला होता. घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि त्यांच्या वयोवृद्ध आईलाही धुरामुळे त्रास होऊ लागल्याने कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याची विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्ती करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
अखिलेश शुक्ला याला याचा राग आला आणि त्याने १० ते १५ गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे.
अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वीही अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजक शेरेबाजी केल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. तुम्ही मराठी माणसे घाण आहात तुमचा वास येतो. तुम्ही मांस मच्छी खाणारे आहात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबीयांनी यापूर्वी केली होती. अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीमध्ये अकाऊंटंट असून IAS अधिकारी असल्याचे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना धमकावायचा, अशीही माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा’
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!
एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..
फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले जाईल!
दरम्यान, या सर्व प्रकरणात मनसेने उडी घेतली असून आपण मारहाण झालेल्या मराठी रहिवाश्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचं मनसेचे कल्याणमधील पदाधिकारी उल्हास भोईर यांनी सांगितलं. जर २४ तासांत या प्रकरणी आरोपींना अटक केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याला इकडे आणून पोलिसांच्या स्वाधीन करणार, असा इशारा भोईर यांनी दिला आहे.