उत्तराखंडमध्ये लव्ह जिहादची प्रकरणे चर्चेत असून या प्रकरणांमुळे उत्तर काशी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. यानंतर येथील मुस्लिमांच्या दुकानाबाहेर दुकाने रिकामी करण्याची मागणी करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. हे पोस्टर्स कोणी लावले याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी मुस्लिम समाजाच्या पुरुषासोबत पळून जात असताना त्यांना पकडण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण वाढले आहे. ‘लव्ह जिहादींनी त्यांची दुकाने रिकामी न केल्यास त्यावेळेनुसार निर्णय घेऊ’ अशी धमकी या पोस्टर्समध्ये देण्यात आली आहे.
एक अल्पवयीन मुलगी दोन पुरुषांसोबत पळून जात असताना त्यांना २७ मे रोजी पकडण्यात आले. त्यामुळे उत्तरकाशी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. या दोघांपैकी एकजण मुस्लिम असल्याने त्याच्यावर रहिवाशांनी लव्ह जिहादचा आरोप केला आहे. भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांतर्गत या दोघांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, संतापलेल्या लोकांनी मुस्लिमांच्या दुकानाबाहेर पोस्टर लावल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून रविवारी रात्री हे पोस्टर लावण्यात आल्याचा अंदाज आहे.
‘परिसरात मुस्लिम समाजातील लोकांच्या मालकीची ३० ते ३५ दुकाने आहेत. या सर्व दुकानांबाहेर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. ही पोस्टर्स स्थानिकांनीच लावली असल्याचा अंदाज आहे, कारण कोणती दुकाने मुस्लिमांची आहेत याची माहिती त्यांनाचं आहे,’ असे मुस्लिम समाजातील एका दुकान मालकाने सांगितले.
हे ही वाचा:
बीबीसीकडून ४० कोटींच्या कर चुकवेगिरीची कबुली
मॉन्सूनचे आगमन १६ जूननंतर होणार!
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार
वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या
नोटीसमध्ये काय लिहिलं आहे?
‘लव्ह जिहादींना सांगण्यात येत आहे की, त्यांनी १५ जून रोजी होणाऱ्या महा पंचायतीपूर्वी त्यांची दुकाने रिकामी करावीत. जर तुम्ही असे केले नाही तर त्यावेळेनुसार आम्ही निर्णय घेऊ’, असे पोस्टर लावण्यात आले आहे. देवभूमी रक्षा अभियान असाही उल्लेख यात करण्यात आला आहे.