कुस्तीगीरांकडून लैंगिक शोषणाचे आरोप झालेले राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या घरी दिल्ली पोलिस पोहोचले आहेत. प्रमुख कुस्तीगीरांनी केलेल्या एफआयआरसंदर्भात उत्तर प्रदेशात दिल्ली पोलिस पोहोचले असून त्यांनी १२ जणांचे जबाब नोंदविले आहेत.
दिल्ली पोलिसांनी या लोकांची नावे नोंदवून घेतले आहेत. त्यांचे पत्ते आणि ओळखपत्रे गोळा केली आहेत. या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्याकडून काही माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.ही माहिती पुरावा म्हणून पोलिसांना उपयोगी पडणार आहे. कुस्तीगीर महासंघातील बृजभूषण यांच्या पाठिराख्यांचीही चौकशी पोलिसांनी केली आहे.
बृजभूषण यांच्यावर जे लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यासंदर्भात विशेष तपास पथकाने १३७ जणांचे जबाब नोंदविले आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ही चौकशी केली असली तरी बृजभूषण यांचीही चौकशी केली आहे का, हे मात्र कळलेले नाही.
हे ही वाचा:
मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीसोबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पाहिला ‘द केरळ स्टोरी’
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!
किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले
विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह
एप्रिलमध्ये दिल्ली पोलिसांकडे बृजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात हे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक या कुस्तीगीरांच्या तक्रारीबरोबरच एका अल्पवयीन कुस्तीगीराच्या जबाबवरूनही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यावरून बृजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने आपली तक्रार मागे घेतल्याचीही बातमी होती पण कुस्तीगीरांनी असे काही घडलेले नाही, असे म्हटले आहे.
बृजभूषण यांच्याविरोधात ३५४, ३५४ अ, ३५४ ड या कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यात दोषी आढळल्यास दोन ते तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. बृजभूषण यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. पण कुस्तीगीरांची मागणी आहे की, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. कुस्तीगीरांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बृजभूषण यांना अटक करण्याची मागणी केली होती.