सहा नवजात बालकांचा मृत्यू झालेल्या विवेक विहारमधील नवजात शिशु रुग्णालयाच्या मालकाने दिल्लीत अनेक रुग्णालये सुरू केली असून आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) त्याला नियमांमधील त्रुटींबद्दल अनेकदा नोटीस बजावली आहे. मात्र तरीही मालकाने ही बाब गंभीरपणे न घेतल्याने ही शोकांतिका घडली.
सन २०१८मध्ये आरोग्य नियामकाने नवीन खिची यांच्या विरोधात विवेक विहार ब्लॉक बी मध्ये बालरोग रुग्णालय चालवल्याबद्दल न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, सन २०१९मध्ये नियामकांना आढळून आले की, एजन्सीने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याचा परवाना रद्द करूनही, त्याने पश्चिम पुरीमध्ये त्याच्या मालकीचे रुग्णालय चालवणे सुरू ठेवले. दिल्ली पोलिसांनी नवीन खिची (४२) आणि आकाश सिंग (२६) या आयुर्वेद डॉक्टरची चौकशी केली. हे दोघे आग लागली तेव्हा बेबी केअर न्यू बॉर्न हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होते, स्थानिक न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या रुग्णालयाकडे परवाना नव्हता, अधिकृत क्षमतेपेक्षा, परवानगीपेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडर साठवले होते, नवजात शिशुंच्या काळजीसाठी त्याचे डॉक्टर पात्र नव्हते आणि इमारतीमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याची सोय किंवा अग्निशामक यंत्रणा नव्हती.
हे ही वाचा:
दिल्ली-वाराणसी इंडिगो विमानात बॉम्बची अफवा, प्रवाशांची धावाधाव!
सुप्रिया सुळे नेता बनण्यात ‘फेल’
तेलंगणाच्या विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघातात मृत्यू
“पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अस्तित्वाची लढाई”
दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नियमांचे उल्लंघन झाल्याची कबुली दिली आणि सांगितले की, राज्य सरकारने संपूर्ण शहरातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी करण्याच्या आणि विवेक विहार अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
‘त्याने एकाच वेळी पाच रुग्णालये चालवली – विवेक विहार बी आणि सी ब्लॉक, पश्चिम पुरी, फरीदाबाद आणि गुरुग्राममध्ये ही रुग्णालये होती,’ असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ‘विवेक विहार बी ब्लॉकमधील रुग्णालय कायदेशीर अडचणीनंतर बंद करण्यात आले होते आणि खर्चाची भरपाई करण्यात अपयशी ठरल्यामुळे फरिदाबाद आणि गुरुग्राममधील रुग्णालये बंद करण्यात आली होती,’ असे पोलिसांनी सांगितले.