दिल्ली स्फोट: टेलिग्रामकडून ‘जस्टिस लीग इंडिया’ वाहिनीची मागवली माहिती

टेलिग्राम चॅनलवर स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज अपलोड करून स्वीकारली स्फोटाची जबाबदारी

दिल्ली स्फोट: टेलिग्रामकडून ‘जस्टिस लीग इंडिया’ वाहिनीची मागवली माहिती

नवी दिल्लीतील रोहिणी येथील सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तानी समर्थक गटाने स्वीकारली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी टेलिग्रामला पत्र लिहून ‘जस्टिस लीग इंडिया’ नावाच्या वाहिनीशी संबंधित माहिती मागवली आहे. या स्फोटानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या टेलिग्राम चॅनलवर स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज अपलोड करण्यात आले असून त्यात स्फोटाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांना अद्याप टेलिग्रामकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान वाजता हा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांना भारतीय एजंट्सने लक्ष्य केल्याचा बदला म्हणून हा स्फोट झाल्याचा दावा टेलिग्राम पोस्टने केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून संभाव्य खलिस्तानी कनेक्शनचा तपास केला जात आहे. दरम्यान, तपास पथकाने ‘जस्टिस लीग इंडिया’ नावाच्या टेलिग्राम चॅनलबद्दल तपशील मागवला आहे. मात्र, याला अद्याप टेलिग्रामकडून प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती आहे.

स्फोट झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी, टेलिग्राम चॅनलवर ‘खलिस्तान जिंदाबाद’ वॉटरमार्क असलेला स्फोटाचा व्हिडिओ एका संदेशासह व्हायरल झाला. संदेशात लिहिले होते की, “जर भारतीय भ्याड एजन्सी आणि त्यांच्या मास्टर्सला वाटत असेल की ते आमच्या सदस्यांना टार्गेट करण्यासाठी गुंड ठेवू शकतात आणि आमचा आवाज बंद करू शकतात तर ते मूर्खांच्या जगात राहतात. आम्ही त्यांच्या किती जवळ आहोत आणि त्यांना लक्ष्य करण्यासाठी आम्ही किती सक्षम आहोत याची ते कल्पना करू शकत नाहीत.” या पोस्टमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या जागतिक भारतविरोधी कारवायांविरुद्ध नवी दिल्लीच्या भूमिकेचा संदर्भ देण्यात आला आहे, विशेषतः कॅनडासोबतच्या अलीकडील राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर.

हे ही वाचा : 

गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील टेकडीवर उभा राहिला ‘अनधिकृत भव्य दर्गा’

भागलपूरच्या प्रसिद्ध शिवशक्ती मंदिरात तोडफोड, हिंदू समाजाकडून निदर्शने!

मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कमी तीव्रतेच्या आयईडीमुळे (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) झाला होता. शिवाय हा स्फोट टायमर किंवा रिमोटद्वारे नियंत्रित केला गेला होता. या स्फोटामुळे शाळेच्या भिंतीच्या काही भागाचे नुकसान झाले आणि जवळपासच्या दुकानांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या शिवाय पार्क केलेल्या अनेक गाड्यांचा काचाही फुटल्या. स्फोटाचा आवाज काही मीटर दूरवर ऐकू गेला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते गुन्हेगारांचा कदाचित अधिकाऱ्यांना इशारा पाठवायचा होता. स्फोटानंतर, राष्ट्रीय तपास संस्था (NIA), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि दिल्ली पोलिसांनी परिसर सील केला असून फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

Exit mobile version