आठ महिन्याची गर्भवती असणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा भाभा रुग्णालयात संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. तिच्यासोबत तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. याप्रकरणाची कुर्ला पोलिसांनी नोंद घेतली आहे.
किरण पाठक (३५) असे या महिलेचे नाव असून ती पती विजय पाठक आणि दोन लहान मुलांसह कुर्ला पश्चिम न्यु.मिल रोड, हरी ओम नगर या ठिकाणी राहत होती. गुरुवारी सकाळी ५ वाजता तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे पती विजय हा तिला घेऊन कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात आला. त्यानंतर तीला लेबर वॉर्ड मध्ये आणण्यात आले. मात्र कुठलाही डॉक्टर तिच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे तिचा त्रास वाढत गेला. ती दोन वेळा पतीला सांगण्यासाठी लेबर वॉर्डातून बाहेर आली.
खूप त्रास होत असून कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाही असे तिने पतीला सांगितले. त्यानंतर ती वॉर्डमध्येच कोसळली असता तेथील महिला सुरक्षा रक्षकाला तिच्या पतीने सांगितले. मात्र त्या सुरक्षा रक्षकाने तुझी पत्नी नाटक करतेय, असं उत्तर दिले.
हे ही वाचा :
लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवान शहीद
इस्लामाबादमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, एका पोलिसाचा मृत्यू
‘पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं’
डॉक्टरांनी तिला तपासून दोन तासांनी तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती किरणचे पती विजय पाठक यांनी दिली आहे. डॉक्टरांनी वेळीच माझ्या पत्नीकडे लक्ष दिले असते तर ती आणि मूल वाचले असते. डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे माझ्या पत्नीचा मृत्यु झाल्याचा आरोप विजय पाठकने केला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.