पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, त्यानंतर या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित पाटील याचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्यासाठी म्हणून ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर हे मेहरबान असल्याचा एक पुरावा समोर आला आहे. ललित पाटील याच्यासाठी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिले होते.
ललित पाटील ससूनमध्ये चार महिने होता. वेगवेगळ्या आजारांची कारणे देत ललित ससूनमध्ये होता. ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याचे पत्र मागील महिन्यात ससुनच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिले होते. हे पत्र माध्यमांच्या हाती लागले आहे. ७ सप्टेंबर २०२३ च्या पत्रात संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाला असून त्याला पाठदुखीचा देखील त्रास होत असल्याच म्हटले आहे. तसेच ललित पाटीलला ओबेसीटी म्हणजे लठ्ठपणाचा देखील त्रास असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
दिल्लीमध्ये वाल्मिकी जयंतीदरम्यान गोंधळ; मशिदीजवळ लाठ्याकाठ्यांनी हल्ला
गुगल मॅपकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता
देशासाठी घातक विचारसरणीला विरोध करण्यासाठी केले केरळमध्ये स्फोट
ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला वेगवेगळे आजार असल्याच कागदोपत्री दाखवण्यात येत होतं. ससून रुग्णालयात भरती असलेल्या ललित पाटीलची माहिती घेण्यासाठी येरवडा कारागृहाकडून विचारणा झाल्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याचं उत्तर पत्रात दिले आहे. आता हे पत्र समोर आल्यानंतर डॉ.संजीव ठाकूर यांच्यासमोर अडचण वाढणार आहे.