मुंब्रा येथील ज्या रेतिबंदर खाडीत मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता, त्याच खाडीत आता ठाण्यातील आणखीन एका व्यावसायिकाचा मृतदेह सापडला आहे. भरत जैन असे या व्यवसायिकाचे नाव असून त्यांचे ज्वेलर्सचे दुकान होते. काही दिवसांपुर्वी भारत जैन यांचे अपहरण झाले होते. या संबंधी ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल असून पोलीस त्यांचा शोध घेत होते. पण अपहरण झालेल्या भारत जैन यांचा मृतदेह आढळून आल्याने ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
भरत हस्तीमल जैन (४२) हे ठाण्यातील मखमली तलाव येथील नीलकंठ सोसायटी येथे पत्नी आणि मुलासह राहण्यास होते. त्याच परिसरातील दगडी शाळेसमोर असणाऱ्या स्नेहलता अपार्टमेंट मध्ये भरत जैन यांचे बी.के. जैन नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे. भरत जैन हे १४ ऑगस्ट रोजी रात्री दुकानातून बेपत्ता झाले होते. रात्री अकरा वाजता भरत जैन यांनी व्हाट्सएप कॉल करून मी मित्रांसोबत आहे, यायला उशीर होईल असे पत्नीला सांगितले होते. त्यानंतर भरत जैन यांचा फोन स्विच ऑफ झाला होता.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
सीताराम कुंटे यांनीच टॅपिंगला मंजुरी दिली होती, मग…
अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?
दुसऱ्या दिवशी पत्नी सीमा जैन हिने पतीला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र फोन पुन्हा स्विच ऑफ लागत असल्यामुळे अखेर तीने नौपाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दोन ते तीन दिवस उलटूनही पतीचा शोध न लागल्यामुळे पत्नी सीमा आणि मुलगा काळजीत पडले व पतीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.
शुक्रवारी दुपारी कळवा पोलिसांना मुंब्रा रेतीबंदर खाडी, गणेश विसर्जन घाट या ठिकाणी एक मृतदेह मिळून आला होता. नौपाडा पोलिसांनी हा मृतदेह तपासला असता तो भरत जैन याचा असल्याची खात्री झाली. भरत जैन याची ओळखीच्याच मित्राकडून अपहरण करून त्यांची हत्या करून मृतदेह खाडीत टाकल्याचे उघडकीस येताच नौपाडा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत जैन हे ज्या वाहनातून मित्रांसोबत गेले ते वाहन पोलिसानी शोधून काढले असून ओला कॅब असून ती ऑनलाइन बुक करण्यात आली होती, कॅब चालकाकडे चौकशी केली असता सर्वाना घणसोली येथे सोडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. कॅब चालकाने दिलेल्या वर्णनावरून अपहरण कर्त्याचा शोध घेण्यात येत असून लवकरच अपहरणकर्त्यांना अटक करण्यात येईल असे पोलसानी सांगितले.