केंद्रीय तपास यंत्रणांनी अंडरवर्ल्डचे पाळमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बाबत या यंत्रणांच्या हाती महत्वाचे पुरावे लागलेले असतांना दाऊदच्या इशाऱ्यावर मुंबईतून हवाला आणि सट्टेबाजीचे सर्वात मोठे रॅकेट चालवणारे ४ ते ५ हस्तक ईडीच्या रडारवर आले असून कुठल्याही क्षणी या हस्तकांना ईडीकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भोवती केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. एनआयए फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच डी कंपनी विरुद्ध बेकायदेशीर कृत्य, खंडणी, देशाविरोधात कटकारस्थान करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डी कंपनी गैरमार्गाने आर्थिक व्यवहार करीत असल्याचे काही पुरावे केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागले असून या अनुषंगाने ईडीने मनीलॉन्डरिंग गुन्हा दाखल करून दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्या बंद घरासह १० ठिकाणी छापेमारी केली.
तसेच दाऊदचा जवळचा हस्तक म्हणून ओळखला जाणारा कुख्यात गँगस्टर छोटा शकील याचा मेहुणा सलीम फ्रुट याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे, तर दुसरीकडे तळोजा तुरुंगात बंद असलेला दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याला मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक करण्यासाठी ईडीने मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून परवानगी घेतली असून ठाणे न्यायालयात इकबालचा ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे.
हे ही वाचा:
धारावी गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले सात जण होते ‘के’ कंपनीचे
पेटीएम, नायका, पीबी आणि झोमॅटो गुंतवणूकदार बुडाले
चिंचपोकळीची पानसरे इमारत कोसळायला आली तरी आमदार निधीतून विटांचे बांधकाम
ईडीने छापेमारीच्या दरम्यान मिळून आलेल्या पुराव्यावरून दाऊदच्या साम्राज्याबाबतची माहिती तसेच दाऊदसाठी मुंबईतून हवाला रॅकेट चालवणाऱ्या त्याच्या काही हस्तकांची माहिती हाती लागली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद याने त्याच्या हस्तकाच्या आणि निकटवर्तीयाच्या माध्यमातून मोठी संपत्ती उभी केली आहे. दाऊद गुन्हेगारी जगतात अजून देखील सक्रिय आहे.
त्याचे हस्तक आजही त्याच्यासाठी काम करतात, हवाला रॅकेटचा माध्यमातून दाऊद आजही पाकिस्तानमधून डी कंपनी ऑपरेट करीत असल्याचे ईडीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दाऊदचे ४ ते ५ हस्तक मुंबईतुन हवाला रॅकेट आणि बेकायदेशीर बेटिंग चालवत आहे.त्यातून येणारा पैसा हवाला मार्फत डी कंपनीला पोहचवला जात असल्याची माहिती हाती लागली असल्याचे ईडीच्या सूत्राचे म्हणणे आहे.हे हस्तक मुंबईतील रियल इस्टेट आणि हवाला रॅकेट ऑपरेट करीत असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणेच्या हाती लागली आहे.