हरियाणा येथे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने मुंबईतील नरिमन पॉईंट येथील शासकीय निवासस्थान असलेल्या इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. आत्महत्या केलेली तरुणी महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची कन्या आहे.अभ्यासाच्या तणावातून तिने आत्महत्येचे कठोर पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून तपास सुरू आहे.
लिपी रस्तोगी (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. लिपी ही महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची कन्या आहे. नरिमन पॉईंट येथील सुरुची या शासकीय इमारतीत हे दाम्पत्य राहत होते. त्यांची २७ वर्षांची मुलगी लिपी ही सोनीपत हरियाणा येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती, सुट्टीमध्ये ती मुंबईत आई वडिलांकडे आली होती, व त्यांच्यासोबत सुरुची इमारत येथे राहत होती.
सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास इमारती वरून काही तरी पडण्याचा आवाज होताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली असता एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. सुरक्षा रक्षकांनी इमारतीत राहणाऱ्याना या बाबत सूचना दिली, असता रहिवाश्यानी घटनास्थळी धाव घेतली असता या तरुणीची ओळख पटविण्यात आली. लिपी रस्तोगी असे या तरुणीचे नाव असून ती आयएएस दाम्पत्य विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची कन्या आहे.
हे ही वाचा:
आंतरवाली सराटीतील गावकरीच जरांगेच्या विरोधात!
सलामीच्याच सामन्यात वेस्ट इंडिजची दमछाक!
मालदीवने दाखवली पॅलेस्टाइनप्रति एकजूटता
एल्विश यादवकडून आपसमर्थक यूट्यूबर ध्रुव राठी याचे लागेबंधे उघड!
रहिवासी आणि सुरक्षा रक्षकांनी विकास रस्तोगी यांना याबाबत सूचना दिली असता तिला तात्काळ जीटी रुग्णालयात आणण्यात आले, डॉक्टरांनी लिपीला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच कफपरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लिपी हिने इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली असून तिने मृत्यूपूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळून आली आहे.
लिपी ही सोनीपत हरियाणा येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती , ती अभ्यासाला घेऊन खुप चिंतेत होती, लिपीने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाच जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे, अशी माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठविण्यात आलेला असून कफ परेड पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे असे पोलीस उपायुक्त मुंढे यांनी सांगितले.