पतीची विष पाजून हत्या केल्याप्रकरणी पत्नीला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. मृत व्यक्तीच्या शरीरात सापडलेल्या थॅलिअम आणि आर्सेनिक या विषारी द्रव्यांचे मूल्य पाहता ही पूर्वनियोजित हत्या असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत सत्र न्यायालयाने सांताक्रूझ येथील गृहिणी कविता शहा (४६) हिला जामीन देण्यास नकार दिला. कविताने प्रियकर हितेश जैन याच्या साथीने पती कमलकांत शहा यांची विष पाजून हत्या केली होती. तिचा अपराध सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असेही निरीक्षण न्यायालयाने मांडले.
धातूच्या चाचणीमध्ये आर्सेनिकचे मूल्य ४२५.७६ आणि थॅलियमचे मूल्य ३६२.३४ होते, जे सामान्य प्रमाणापेक्षा जास्त होते. आर्सेनिकचे सामान्य मूल्य ०.४ ते ११.९ आहे आणि थॅलियमचे मूल्य ०.१५ आणि ०.६३ आहे. डॉक्टरांना मृताच्या शरीरात विषारी पदार्थ आढळून आल्यावर डॉक्टरांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना ताबडतोब ‘मेटल टेस्ट’ करून घेण्याची शिफारस केली होती. कविता शहा यांनी सुरुवातीला या चाचणीला नकार दिला. मात्र नंतर मात्र तिने ही चाचणी केली, याकडे न्यायाधीश एसडी कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.
कविता आणि हितेश जैन यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. याआधी कविता आणि कमलकांत यांच्यात भांडण झाले होते आणि त्यामुळे कमलकांत यांनी घर सोडले होते, हेही न्यायाधीशांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर, कविता ही कमलकांत यांच्या घरी राहू लागली होती. मात्र वर्षभरातच कमलकांत यांची आई सरलादेवीची आणि नंतर पती कमलकांत मरण पावले,’ असे निरीक्षण न्यायाधीशांनी मांडले.
हे ही वाचा:
“‘सामना’मधील अग्रलेखाला महत्त्व देत नाही”
आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या
पश्चिम बंगालच्या केरळ स्टोरीवरील बंदीविरोधात निर्माते गेले सर्वोच्च न्यायालयात
लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले
न्यायाधीशांनी साक्षीदारांच्या जबाबाकडेही लक्ष वेधले. “मी संबंधित वेळी मृताच्या घरी घरकाम करणारे लक्ष्मण चौधरी यांचा जबाब पाहिला आहे. कविता या स्वयंपाक करायच्या, असा यात उल्लेख आहे. तसेच, हे करत असताना कविता या लक्ष्मण यांना स्वयंपाकघराच्या बाहेर ठेवायच्या,” असे न्यायाधीश म्हणाले. तसेच, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तिला जामिनावर सोडल्यास त्याचा परिणाम पुरावे गोळा करण्यावर होईल, असे मांडत त्यांनी कविता यांचा जामीनअर्ज फेटाळला.