आय आय टी मुंबईतील दर्शन सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण अलीकडे बरेच गाजले. पण १० एप्रिल २०२३ रोजी दर्शनने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ज्याचे नाव लिहिले होते, तो विद्यार्थी अरमान खत्री हा मुस्लीम असल्याचे उघड झाल्याने प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. आणि माध्यमांतून अचानक “शोले” मधील इमाम – ए के हंगल – यांच्या त्या प्रसिद्ध संवादाची आठवण यावी, (इतना सन्नाटा क्यो है भाई ……?) अशी शांतता पसरली आहे!
ह्या अचानक पसरलेल्या शांततेची कारणे जाणून घ्यायला हवीत. ती मुख्यतः जिथे अल्पसंख्य मुस्लिमांचा प्रश्न येईल, तिथे ‘ब्र’ सुद्धा न काढण्याच्या आपल्या माध्यमांच्या भयभीत वृत्तीत आढळतात.
या संदर्भात काही मुद्दे :
१. आता पर्यंत जवळजवळ सर्वांनी असे धरून चालण्याची चूक केली, की ही आत्महत्या दर्शन सोळंकी हा विद्यार्थी आरक्षित वर्गातून आलेला असल्याने, त्याला त्याच्या उच्चवर्णीय सहाध्यायी वर्गमित्रांनी त्याच्या कमी गुणांवरून, मेरीट यादीतील स्थानावरून, जातीवाचक टोमणे मारून हिणवल्याने झाली असावी. हे गृहितक साफ चुकीचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लोकसत्ता (चतुःसूत्री) मधील राजू केंद्रे यांचा २२ मार्च २०२३ चा लेख – आपली विद्यापीठे आणि सामाजिक न्याय – यामध्ये तर त्यांनी – मेरिटच्या खोट्या, उथळ, विखारी आणि मर्यादित संकल्पना असे म्हणून आपल्या प्रवेश प्रक्रियेवरच घणाघाती टीका केली.
आज आपल्या किमान चार आय आय टीज जागतिक गुणवत्ता यादीत पहिल्या पन्नासात स्थान राखून आहेत, याचा अर्थ आपली प्रवेश पद्धती आंतरराष्ट्रीय निकषावर निश्चितच योग्य ठरते, याचेही भान त्यांनी ठेवले नाही. आता दर्शनची आत्महत्या जातीय टोमणे / जातीवरून हीन लेखण्यामुळे झालेली नाही, हे स्पष्ट झाल्यावर ते आपल्या चुकलेल्या भूमिकेचा प्रांजळपणे पुनर्विचार करतील का ?
हे ही वाचा:
विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ संबोधावे
उत्तर प्रदेशचा खतरनाक गुंड अतीकचा मुलगा असदचे एन्काऊंटर
ढलती का नाम महाविकास आघाडी मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा?
मेड इन इंडियाच्या बळावर ऍपलची निर्यात ४५ हजार कोटींवर
२. या लेखात राजू केंद्रे म्हणतात : प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रवेश परिक्षांची तथाकथित मेरीटधारी प्रक्रियाही सांस्कृतिक -आर्थिक भांडवल असणाऱ्यांसाठी पूरक बनवलेली आहे पुढे – मेरिटच्या खोट्या, उथळ, विखारी आणि मर्यादित संकल्पना त्यांच्या (ग्रामीण / आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या) अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करतात, असे त्यांनी म्हटले आहे. ह्यात मेरिटच्या खोट्या, उथळ, विखारी आणि मर्यादित संकल्पना म्हणजे नेमक्या कोणत्या ? आपल्याकडील कॅट, नीट, जे इ. इ. आदि प्रवेश परीक्षा या आंतरराष्ट्रीय स्तराच्या मानल्या जातात. त्यामुळेच आपल्याकडील आय आय टी सारख्या संस्था जागतिक क्रमवारीत स्थान टिकवून आहेत, असे असताना प्रवेश प्रक्रियेवरील हा आरोप अवास्तव व निराधार आहे.
आपल्याकडील मेरीटच्या संकल्पना राजू केंद्रे म्हणतात, तशा नसून प्रत्यक्षात कशा आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी टाईम्स ऑफ इंडिया २३ मार्चमधील पृष्ठ १४ वरील बातमी वाचावी असे सुचवेन. त्यात QS वर्ल्ड युनिवर्सिटी रँकिंग्स २०२३ विषयी सविस्तर माहिती आलेली असून त्यामध्ये आपल्याकडील चार आय आय टीज – मद्रास, मुंबई, खरगपूर व दिल्ली ह्या संस्था जागतिक दर्जाच्या क्रमवारीत पहिल्या पन्नासात स्थान राखून आहेत, हे दिसते. अर्थात सगळ्या जगातच मेरिटच्या संकल्पना – खोट्या, उथळ, विखारी आणि मर्यादित – असल्याचे म्हणायचे असेल, तर बोलणेच खुंटले!
३. पुढे त्याच लेखात केंद्रे यांनी Atrocity कायद्यात दुरुस्ती करून तो या प्रकरणात लावावा अशी मागणीही केली. दर्शनच्या पालकांनी, तसेच काही विद्यार्थी संघटनांनीही अशीच मागणी, (बहुधा ह्याच गैरसमजातून) केली. तो कायदा, एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ, किंवा हीन लेखणे, तशी टिप्पणी करणे, ह्याबाबत आहे. इथे वेगळेच झालेले आहे. स्वतः दर्शनने अरमानला त्याच्या धर्मावरून काही सुनावले, ज्यामुळे भयंकर रागावून अरमानने त्याला कटर दाखवून धमकावले असा प्रकार दिसतो. आता याबातीत Atrocity लावण्याची मागणी करणारे घटक तरी ती लावून धरतील का ?
४. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लीम समाजातील , विशेषतः युवकांतील मूलतत्त्ववाद, किंवा कट्टरता ह्याचा संबंध त्यांच्यातील शिक्षणाची कमतरता किंवा अभावाशी बरेचजण जोडतात. पुरेसे उच्च शिक्षण मिळाले, की मुस्लीम युवक कट्टरतेपासून दूर होतील, असे समजले जाते. अरमान खत्रीने ते गृहितक ही खोटे ठरवले आहे. तो आय आय टी मुंबई सारख्या संस्थेत शिक्षण घेत होता. उद्या तो उच्च शिक्षित अभियांत्रिकी पदवीधर होऊन बाहेर पडला असता. तरीही दर्शनसारख्या एका सहाध्यायीने धर्मावरून केलेली टीका त्याला इतकी असह्य होती, की त्याने कटर दाखवून दर्शनला धमकावले.
नुपूर शर्माची कथित बाजू घेणाऱ्या उदयपूरच्या कोणा शिंप्याला आणि विदर्भातील कोणा फार्मासिस्टला ज्यामुळे आपले प्राण गमवावे लागले, तीच ही खुनशी मानसिकता आहे. मुस्लीम समाजातील शिक्षणाच्या प्रसाराशी कट्टरतेचा मुळीच संबंध नाही. त्यांच्यातील उच्च शिक्षित ही तितकेच कट्टर असू शकतात, जितके अशिक्षित निम्नशिक्षित. आणि विशेष म्हणजे ही कट्टरता इतकी टोकाची असते, की ती दुसऱ्याचा जीव घेऊ शकते, असे अनेक उदाहरणांवरून समोर आलेले आहे. दर्शन यामुळेच घाबरला व त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. मुख्य म्हणजे, जिथे हिंदूंमधील तथाकथित ‘उच्चवर्णीय’ (सामान्य प्रवर्ग) आणि आरक्षित प्रवर्गातील ‘अनुसूचित जाती जमाती’ यांचा परस्पर संबंध येतो, तिथे हिरीरीने, तावातावाने आगलावी भाषा वापरायची, आणि जिथे एकूण हिंदू समाज आणि अल्पसंख्य मुस्लीम समाज यांचा संबंध येतो, तिथे मात्र मतलबी मौन पाळायचे, हा आपल्या माध्यमांचा दुटप्पीपणा आता उघड होऊ लागला आहे.
आता या प्रकरणी आधी ज्या ज्या घटकांनी ज्या वेगवेगळ्या आक्रमक भूमिका हिरीरीने घेतल्या, त्यांना त्यांच्या भूमिका नव्याने तपासून घेण्याची गरज आहे. निदान आपण त्या भूमिका पुढे रेटण्यात थोडी घाई केली, हे तरी त्यांनी आता प्रांजळपणे मान्य करावे. आणि जमल्यास मुस्लिमांमधील कट्टरता रोखण्यासाठी काय उपाय करता येतील, ह्याचाही विचार करावा.
-श्रीकांत पटवर्धन