‘डाकू हसिना’ला आवरला नाही १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह अन्…

त्यांच्याकडून पाच कोटी ९६ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

‘डाकू हसिना’ला आवरला नाही १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह अन्…

पंजाबच्या लुधियानामध्ये आठ कोटी ४९ लाख रुपयांच्या चोरीची मास्टरमाइंड ‘डाकू हसिना’ मनदीप कौर उर्फ मोना हिला पंजाब पोलिसांनी जेरबंद केले आहे. ती उत्तराखंड येथील चमोलीस्थित हेमकुंड साहिब येथे दर्शनाला जात असताना तिला तिथे मोफत मिळणाऱ्या अवघ्या १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह आवरता आला नाही. मोफतची फ्रुटी घेताना ती थांबली आणि तिला अटक करण्यात आली. तेव्हा तिच्यासोबत तिचा पतीही होता. या प्रकरणी आधीच पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच कोटी ९६ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 

‘हे दोघे नेपाळमार्गे परदेशात पळू शकतात, अशी खबर मिळाली होती. मात्र लूकआऊट नोटीस जाहीर केली गेल्यामुळे ते यात यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांच्याजवळून २१ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच, त्यांचे सहकारी गौरव उर्फ गुलशन यांना गिडदबाहा येथून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून आठ कोटी ४९ लाख रुपयांपैकी पाच कोटी ९६ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 

 

कॅश व्हॅनची चोरीचा कट यशस्वी झाल्यामुळे मनदीप कौर उर्फ मोना हेमकुंड साहिबच्या दर्शनासाठी पोहोचली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोनाला पकडण्यासाठी मोफत फ्रुटी दिली जात असल्याचे भासवले. मोना हीच फ्रुटी घेण्यासाठी थांबली आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडली. हेमकुंड येथून परत येत असताना तिला अटक करण्यात आली. त्यानंतर हेमकुंड येथून केदारनाथ आणि हरिद्वार जाण्याचीही त्यांची योजना होती.

 

कधी झाली होती चोरी?

१० जून रोजी रात्री दीड वाजता सशस्त्र चोरांनी लुधियानातील न्यू राजगुरू नगर परिसरातून एका कॅश व्हॅनची चोरी केली होती. पोलिसांना लुधियानापासून २० किमी दूर अंतरावरील मुल्लांपूर गावात कॅश व्हॅन बेवारस अवस्थेत सापडली होती. व्हॅनमधून धारदार शस्त्रे आणि दोन पिस्तुलेही पोलिसांना सापडली होती. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी जीपीएस ट्रॅकर आणि परिसरातील मोबाइल टॉवरची माहिती काढली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाचजणांना अटक केली होती. त्यांच्याकडून पाच कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. मात्र मुख्य सूत्रधार मनदीप कौर उर्फ मोना, तिच्या पतीसह पाच व्यक्ती फरार होत्या. सोशल मीडियावर मोनाचा ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांसोबतचा व्हिडीओही पोलिसांना मिळाला होता. पोलिस सातत्याने मोनाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

हे ही वाचा:

‘या’ सीनमुळे काठमांडूमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी!

आम्हाला धमकावलेले नाही… अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दावे फेटाळले

‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

फिलिपाईन्सच्या बोटीला भीषण आग, १२० जणांची सुटका !

या चोरीमध्ये कॅश व्हॅन असणाऱ्या कंपनीचा कर्मचारीही सहभागी होता. तो या कंपनीत चार वर्षे काम करत होता. त्यामुळे त्याला कंपनीबद्दल इत्थंभूत माहिती होती. चोरीच्या दिवशी ते सर्व इमारतीच्या मागच्या दरवाजाने दाखल झाले होते आणि व्हॅनला लुटून गेले होते.

पोलिसांना १० लाखांचे बक्षीस

या चोरीचा उलगडा करणाऱ्या पोलिस पथकाला १० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तरी अद्याप काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. १०० तासांच्या आत चोरांना पकडण्यात आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.

Exit mobile version