एका पित्याने हिंमत न हरल्याने पोलिसांना एक केस पुन्हा उघडावी लागली आहे. तसेच, पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. स्वतःच्या १५ वर्षांच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पित्याने स्वतःच सर्व पुरावे जमा केले आणि त्यांना न्यायालयासमोर सादर केले. हे पाहून न्यायालयाने पोलिसांच्या कार्यवाहीवर ताशेरे ओढले आहेत.
सन २०१५मध्ये जितेंद्र चौधरी यांच्या मुलाला गाडीने चिरडले होते. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. तर, विद्यार्थ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. पित्याने घटनास्थळी सापडलेल्या गाडीच्या साइड मिरर आणि धातूच्या एका तुकड्याच्या साह्याने आरोपीचा माग काढला.पोलिसांनी या प्रकरणी रॅश ड्रायव्हिंग आणि अपघाती मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र पोलिसांनी ‘हिट अँड रन’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास रस दाखवला नव्हता. अपघात करणाऱ्या चालकाचा शोध न लागल्याने पोलिसांनी ही केस बंद केली होती. मात्र यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या पित्याने अपघाताच्या ठिकाणी सापडलेल्या साइड मिररच्या साह्याने स्वतःच या प्रकरणाचा तपास सुरू केला.
हे ही वाचा:
झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!
संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!
एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!
पित्याने कोणती गाडी साइड मिरर दुरुस्त करण्यासाठी आली होती का, याच्या शोधासाठी सर्व वर्कशॉप आणि सर्व्हिस सेंटर धुंडाळले. तेव्हा तिथे काम करणाऱ्या एका मेकॅनिकने एक स्विफ्ट गाडी साइड मिरर दुरुस्त करण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र सर्व्हिस सेंटरकडून अन्य काही पुरावा न मिळाल्याने त्यांनी ही गाडी बनवणाऱ्या ऑटोमोबाइल कंपनीकडे धाव घेतली. अनेक महिने तपास केल्यानंतर या वाहनाचा माग काढण्यात त्यांना यश आले. ‘आरशाच्या मागील बाजूस छापलेल्या बॅच नंबरच्या मदतीने गाडी आणि तिच्या मालकाचा नोंदणी क्रमांक शोधण्यात यशस्वी झालो. मी गाडीचे सुटे भाग पोलिसांना सुपूर्द केले. त्यात नोंदणी क्रमांकाचाही समावेश होता. (ज्याचा एफआयआरमध्ये उल्लेख नव्हता),’ असे चौधरी यांनी सांगितले. तरीही चौकशी पुढे सरकली नव्हती.
अखेर त्यांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत याचिका दाखल करून जानेवारी २०१६मध्ये स्थानिक न्यायालयात धाव घेतली, ज्या अंतर्गत दंडाधिकारी एखाद्या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश देऊ शकतात. न्यायदंडाधिकारी आकृती वर्मा यांच्या न्यायालयाने तपास अधिकाऱ्याकडून स्थिती अहवाल मागवला. पोलिसांनी एप्रिलमध्ये एक अहवाल सादर केला, ज्यामध्ये आरोपचा शोध लागत नसल्याचे सांगण्यात आले. २७जुलै रोजी न्यायालयाने अहवाल स्वीकारला. त्याने एप्रिल २०१८मध्ये पुन्हा न्यायालयात धाव घेतली. मात्र ती फेटाळण्यात आली. या आदेशाला जितेंदर यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यांची याचिका पुन्हा फेटाळण्यात आली. सन २०२०मध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांची केस पुन्हा डळमळीत झाली. त्यांनी जानेवारी २०२३ पुन्हा न्यायालयात धाव घेतली, यावेळी आपल्या मुलाला धडकणाऱ्या वाहनाच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली. अखेर न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून तसेच उपलब्ध पुरावे पाहून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.