मनी लॉन्डरिंग च्या गुन्हयात ईडीने अटक केलेला ७६ वर्षीय बांधकाम व्यवसायिक आणि फिल्म फायनान्सर युसुफ लकडावाला याचा गुरुवारी दुपारी मृत्यु झाला आहे.
लकडावाला हा आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता, गुरुवारी सकाळी तुरुंगातच त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सर. जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता युसूफ लकडावाला याला मृत घोषित केले.
फेब्रुवारी २०१९ मध्ये हैद्राबाद येथील नवाब याची खंडाळ्यातील सुमारे ५० कोटी रुपयांची ४ एकर ३८ गुंठे जमीन विकत घेण्यासाठी जमिनीच्या सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत युसूफ लकडावाला यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणूक, बोगस दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान युसूफ लकडावाला हा भारताच्या बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अहमदाबाद येथून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
हे ही वाचा:
बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम
खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी
अरबी समुद्रात नौकानयनपटूंनी भरली शिडात हवा
आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हयात जामीनावावर बाहेर पडल्यानंतर ईडीने मनी लॉन्डरिंग चा गुन्हा दाखल करून २८ मे रोजी युसूफ लकडावाला याला ईडीकडून अटक करण्यात आली होती. ईडी कोठडी नंतर युसूफ लकडावाला याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. युसूफ लकडावाला याला अनेक आजारांनी ग्रासले होते. गुरुवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि तुरुंग प्रशासनाने त्याला तात्काळ उपचारासाठी सर. जे.जे रुग्णालयात आणले असता दुपारी १२ वाजता त्याचा मृत्यू झाला.