मनी लाँडरिंग प्रकरणात नाव गुंतल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेकडून २५ कोटी लुबाडले

पोलिसांकडून तपास सुरू

मनी लाँडरिंग प्रकरणात नाव गुंतल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेकडून २५ कोटी लुबाडले

मुंबईतून सायबर फसवणुकीच्या घटनेची माहिती समोर आली आहे. मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा वैयक्तिक सायबर स्कॅम झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका महिलेची २५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत महिलेने ही रक्कम गमावली असून फसवणूक झाल्याचे कळताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही एका बहुराष्ट्रीय कंपनीतील निवृत्त संचालक आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ६ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला सायबर चोरट्यांचा पहिला फोन आला. व्हॉट्सअपवर हा कॉल आला होता. सदर व्यक्तीने तो टेलिकॉम विभागातील अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिलेचे तीन मोबाइल क्रमांक लवकरच बंद करणार आहोत, असे सांगितले. पीडित महिलेने याचे कारण विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यांकडे कॉल ट्रान्सफर करत असून तेच याबद्दल माहिती देतील, असे सांगितले.

पुढे दुसऱ्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिला मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपी आहे, अशी बतावणी केली. महिलेच्या विरोधात मनी लाँडरिंगची तक्रार दाखल झाली असून मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड या खटल्याशी लिंक झाले आहे, असेही समोरून महिलेला सांगण्यात आले. यानंतर स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीकडे कॉल ट्रान्सफर केला. तिसऱ्या व्यक्तीने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिलेला धमकावले. जर या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर महिलेला त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवावे लागतील. चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे पैसे परत करू, असेही सांगण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांच्या काळात सदर महिलेने भीतीच्या सावटाखाली या चोरट्यांना २५ कोटी रुपये पाठविले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला.

हे ही वाचा:

समाजवादी काँग्रेसला मार्क्सवादाचे वळण

वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते नसीम खान नाराज; स्टार प्रचारक पदाचा राजीनामा

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

मतदाना ऐवजी तरुणाने घातला ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचा घाव!

माहितीनुसार, सायबर चोरट्यांच्या धमकीनंतर पीडित महिलेने स्वतःचे आणि आपल्या आईच्या नावे असणारे शेअर्स विकले. तसेच म्युच्युअल फंडची गुंतवणूक काढून घेतली आणि सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले. ते पैसे सायबर चोरट्यांना पाठविले. हा सर्व घटनाक्रम दोन महिन्यांपासून सुरू होता. दरम्यान, सायबर चोरट्यानी महिलेच्या नावानेच चालू बँक खाते उघडले होते. या खात्यात पैसे जमा करावेत, असे महिलेला सांगण्यात आले. हे पैसे रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच या पैशांची पावती स्थानिक पोलीस स्थानकातून मिळेल, असेही महिलेला सांगण्यात आले. महिलेने २५ कोटी पाठविल्यानंतर तिला तिचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आतापर्यंत ३१ बँक खाती गोठविली आहेत.

Exit mobile version