नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही

हरियाणा सरकारच्या चौकशीत उघड

नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही

३१ जुलै रोजी मिरवणुकीवर पूर्वनियोजित हल्ले करण्यात सायबर गुन्हेगारांचा सहभाग होता, असे हरियाणा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. हरियाणा राज्याच्या पोलिसांनी मेवातमधील सायबर चोरांवर छापा मारून संपूर्ण भारतात चाललेल्या फसवणुकीच्या घटना उघडकीस आणल्या होत्या. या सायबरगुन्हेगारांना याचा बदला घ्यायचा होता.  

पोलिसी कारवाईने गोंधळलेले हे सायबरगुन्हेगार त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अस्वस्थ होते. ३१ जुलै रोजी जेव्हा हिंसाचार उसळला, तेव्हा गुन्हेगारांनी सर्वांत आधी एका सायबर पोलिस ठाण्याला लक्ष्य केले आणि पुरावे नष्ट केले. पोलिसांच्या मते, मेवातमध्ये सायबर गुन्हेगारांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे २७ एप्रिल रोजी रात्री हरियाणा पोलिसांनी नूहच्या १४ गावांमध्ये छामे मारले होते. तेव्हा अनेक संशयित हॅकरना ताब्यात घेण्यात आले होते आणि सुमारे १०० आरोपींना अटक करण्यात आली होती. या सायबरचोरांनी केलेली देशभरातील एकूण २८ हजार प्रकरणे उघडकीस आली असून यातून त्यांनी १०० कोटी रुपयांची लूट केल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल या सायबरचोरांनी हे हल्ले केल्याचे पोलिसांनी सांगितले.  

हिंसाचार आणि मिरवणुकीचा कोणताही संबंध नाही, असाही ठाम दावा पोलिसांनी केला. अशा प्रकारची मिरवणूक याआधी दोनदाही झाली आहे. डिसेंबरमध्येही अशी मिरवणूक झाली होती. यात्रेच्या आधी दोन्ही पक्षांची बैठक झाली होती. ही मिरवणूक शांततापूर्ण काढली जाईल आणि पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले गेले होते. पोलिसांनी मिरवणुकीसाठी आधीच १० तुकड्या तैनात केल्या होत्या. मात्र शांतता समितीने मिरवणूक शांततापूर्ण रीतीने काढली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्हाला हिंसाचार होईल, असे वाटले नव्हते,’ असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

हे ही वाचा:

एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो नाचवणे हा योगायोग नाही

केदारनाथ यात्रेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळून १३ लोक बेपत्ता

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, खासदारकी परत मिळणार

नितीन देसाई यांच्या ११ ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय? गुन्हा दाखल होणार  

हिंसाचारात सहभागी आरोपींची पोलिसांनी लांबलचक यादी तयार केली आहे. त्यांची चौकशी सुरू असून हिंसाचारात सहभागी असणाऱ्या कोणाचीच गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलिसांनी दिली. पोलिसांनी गुरुवारपर्यंत हिंसाचारप्रकरणात पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ९३ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी १७६ जणांना अटक करण्यात आली असून ७८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version