एका ७० वर्षीय वृद्धाची विम्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याबद्दल सायबर पोलिसांनी नवी दिल्ली येथून सहा जणांना अटक केली आहे.
विमा कंपनीतून बोलत असल्याचे भासवून या टोळीने वृद्धाकडून तब्बल ७४ लाख रुपये उकळले आहेत. अदनान खान, सौरभ कन्हैयालाल, प्रसूनकुमार सिन्हा, हर्षित छीक्कारा, पंकज शहा आणि मोहित मित्तल अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे आहेत.
कोरोना काळात विमा तसेच इतर आरोग्य विषयक गोष्टींची मागणी वाढल्याचे लक्षात घेऊन एका तरुणाने ७४ वर्षीय वृद्धाला विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या आरोग्य विम्यापेक्षा चांगला आणि स्वस्त विमा आपली कंपनी देत असल्याचे या तरुणाने सांगितले. वृद्धाचा विश्वास बसल्यावर या तरुणाने विमा अपडेट, नवीन नोंदणी अशी अनेक कारणे सांगून वृद्धाकडून ७४ लाख उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वृद्धाने मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्ह्याचे गांभीर्य आणि मोठी रक्कम लक्षात घेता पोलिसांनी त्वरित तपासाला सुरुवात केली.
हे ही वाचा:
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश
पंतप्रधान मोदींचे खास संस्कृत ट्विट! म्हणाले…
“आमच्या सहनशक्तीच्या अंत पाहू नका…” मुफ्तींची मुक्ताफळे
कल्याण सिंह यांच्या निधनानाने उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा
तपासासाठी उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी वेगवेगळ्या सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले. बँक तपशील, मोबाईल क्रमांक आणि इतर तपशील बारकाईने पहिले असता वृद्धाला नवी दिल्ली येथून संपर्क करण्यात आल्याचे उघडकीस आले. सायबर पोलीस पथक दिल्लीला रवाना होताच दिल्ली सायबर सेलच्या मदतीने सहा जणांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान या टोळीने देशभरात असेच अनेक लोकांना फसवल्याचे समोर आले आहे. या गुन्हे पद्धतीच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये या आरोपींचा समावेश आहे का, याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.