अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’मध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये घडला आहे. विशेष बाब म्हणजे फसवणूक झालेल्यांची संख्या तब्बल १११ असल्याची बाब समोर आली आहे. ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून याप्रकरणी ओमकारला नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
ओमकार तलमले याने तो २०१७ सालापासून ‘नासा’मध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत असल्याचे सर्वांना सांगितले होते. तसेच आपल्या संपर्काच्या माध्यमातून नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये नोकरी लावून देऊ शकतो, अशी बतावणी त्याने तरुणांना केली होती. नोकरीच्या नावाखाली ओमकार त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये लुबाडत होता. ओमकारने या १११ जणांकडून तब्बल ५ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये लुबाडले आहेत.
विशेष बाब म्हणजे ओमकार ने अनेक तरुणांना नासाच्या खोट्या लेटर पॅडवर अपॉइंटमेंट लेटरदेखील देऊ केले. सध्या ओमकार हा हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. लवकरच नागपूर शहर पोलीस फसवणुकीच्या या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहेत. त्यानंतर फसवणुकीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे.
व्यापाऱ्यांच्या हत्येचाही आरोप
आठवड्यापूर्वी नागपूर शहरात पैशांचे आमिष दाखवून दोन व्यापाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना कोंढळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. हत्या केल्यानंतर दोघांचाही मृतदेह जाळून नदीत फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अंबरीश गोळे आणि निरालाकुमार सिंग अशी मयत व्यापारांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी पाच मारेकऱ्यांना अटक केली होती. अंबरीश हे कंत्राटदार होते तर निरालाकुमार सिंग यांचा कापड विक्रीचा व्यवसाय होता. या प्रकरणात ओमकार तलमलेचा सहभाग होता.
हे ही वाचा:
नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही
मणिपूरवर राज्यसभेत ११ ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता
सध्या ओमकार हा हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. लवकरच नागपूर शहर पोलीस फसवणुकीच्या या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे आणि त्यानंतर फसवणुकीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत.