पूर्व उपनगरातील ५३ सराईत गुन्हेगारांना करण्यात आले तडीपार

पूर्व उपनगरातील ५३ सराईत गुन्हेगारांना करण्यात आले तडीपार

विधानसभा निवडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरासह उपनगरात प्रतिबंधक कारवाईला सुरुवात केली आहे.निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे.

पूर्व उपनगरातील परिमंडळ ६ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी ५३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेले सर्व सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चेंबूर, नेहरू नगर, टिळक नगर, गोवंडी, शिवाजी नगर, देवनार, आरसीएफ, मानखुर्द आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाण्याकडून या अभिलेखावरील गुन्हेगारांना मुंबई, ठाणे, रायगड जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे.

पूर्व उपनगरात अणुशक्ती नगर विधानसभा , मानखुर्द – शिवाजी नगर विधानसभा तसेच कुर्ला विधानसभा हे अतिशय संवेदनशील मतदार संघ आहे. त्यातील मानखुर्द- शिवाजी नगर हा मतदार संघ सर्वात अधिक संवेदनशील असून मानखुर्द – शिवाजी नगर मतदार संघातून समाजवादी पार्टीचे उमेदवार अबू आजमी तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार नवाब मलिक यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे.

हे ही वाचा:

भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जगावर उपकार केले नाहीतर…

तेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड

जम्मू- काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?

नवाब मलिक यांनी अमली पदार्थाला मुद्दा बनवला असून मानखुर्द -शिवाजी नगर अमली पदार्थ मुक्त करण्याची घोषणाबाजी करून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली, दरम्यान मलिक यांनी समाजवादी पार्टीच्या कार्यालयात सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीचा फोटो ‘एक्स’ हँडल वर पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती.

या व्हिडीओवरून मानखुर्द शिवाजी नगर येथील वातावरण तापले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई शहरासह पूर्व उपनगरात गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे, अमली पदार्थ विक्रीवर प्रतिबंधक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पूर्व उपनगरातील परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मानखुर्द, शिवाजी नगर, चेंबूर, टिळक नगर ट्रॉम्बे, नेहरू नगर इत्यादी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगाराची यादी तयार करून आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत परिमंडळ ६ च्या हद्दीतून ५३ गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ५७ अन्वये कारवाई करून या सर्व गुन्हेगारांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याबाहेर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version