पोक्सो गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.आरोपीला अमली पदार्थाचे व्यसन होते, त्यात त्याला तुरुंगात दोन वेळा फिट आल्यामुळे जे. जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आर्थर रोड तुरुंगाचे अधिक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली. दरम्यान आरोपीच्या कुटूंबियांकडून या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आरिफ मेहबूब कुरेशी (२२) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरिफ याला काळाचौकी पोलिसांनी पोक्सोच्या गुन्हयात १६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. ४ दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर २० सप्टेंबर रोजी आरिफ कुरेशी याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. २१ सप्टेंबर रोजी आरोपी कुरेशी याला तुरुंगात फिट आल्यामुळे त्याच्यावर तुरुंगात प्राथमिक उपचार करण्यात आले होते.
हे ही वाचा:
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव
डोक्यात गोळी लागल्याने अक्षय शिंदेचा मृत्यू
‘द लीजेंड ऑफ मौला जट’ पंजाब मध्ये प्रदर्शित होणार ?
लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात ५५८ ठार, हिजबुल्लाहने प्रत्युत्तरादाखल २०० रॉकेट डागले
दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा फिट आल्यामुळे उपचारासाठी जे. जे.रुग्णालयात भरती करण्यात आले होती. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी आरिफ कुरेशी याचा मृत्यू झाला. आरिफ कुरेशीच्या कुटूंबियांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आल्यानंतर कुटूंबियांनी जे. जे.रुग्णालय येथे धाव घेतली. आरिफची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आम्हाला का देण्यात आली नाही, आरिफचा मृत्यू संशयास्पद असून या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुटूंबियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान ना. म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.