पोलीस कोठडीत विडी दिली नाही म्हणून एका गुन्ह्यातील आरोपीने स्वतःचे डोके भिंतीला आपटून घेतल्याचा प्रकार बोरिवली सामान्य पोलीस लॉकअप येथे घडला आहे. जखमी झालेल्या आरोपीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डोकेफोडीमुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
अयाज जुमई खान (१९) असे विडीसाठी डोके फोडून घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अयाज खान आणि त्याचा साथीदार इम्रान खान (२६) या दोघांना गोरेगाव पोलिसांनी ३ मे रोजी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हे दोघे पोलिसांच्या कोठडीत असतांना त्यांना बोरिवली येथील जनरल पोलीस लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत कुरार पोलीस ठाण्याने खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेला महेश सोनी (५१) हा देखील होता.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले
मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले
ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळेच हा दुर्दैवी निर्णय
…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील
विडी आणि तंबाखू मागितली
बोरिवली जनरल लॉकअप ड्युटीसाठी तैनात असणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्याकडे अयाज आणि इम्रान यांनी विडी आणि तंबाखू मागितली, मात्र लॉकअप मध्ये असे काहीही देण्याची परवानगी नसल्याचे ड्युटीवरील पोलीस अंमलदारांनी दोघांना सांगितले. मात्र तुम्ही विडी दिली नाही तर मी स्वतःला इजा करून घेईल अशी धमकी अयाज याने दिली. पोलिसांनी त्याला समजावून कोठडीत जाण्यास सांगितले.
खुनातील आरोपीने दिली खबर
अयाज आणि इम्रान सोबत कोठडीत बंद असणारा कुरार पोलीस ठाण्यातील खुनातील आरोपी महेश सोनी हा धावतच कोठडीतून बाहेर आला आणि त्याने लॉकअप ड्युटी वरील पोलिसांना अयाज स्वतःचे डोकेफोडून घेत असल्याचे कळवले. पोलिस अंमलदार यांनी तातडीने कोठडी धाव जखमी अयाजला बाहेर काढून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून बोरिवली पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
डोकेफोडीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली
अयाज खान यांच्यावर उपचार करून पुन्हा त्याला कोठडीत डांबण्यात आले. मात्र जो पर्यत अयाज हा पोलीस लॉकअपमध्ये आहे, तोपर्यंत तो काहीही करू शकतो अशी भीती लॉकअप ड्युटी वरील पोलिसांना सतावत आहे. त्यामुळे दिवसरात्र अयाज वर लक्ष ठेवण्यात येत आहे. अयाजच्या डोकेफोडी मुळे मात्र पोलिसांची डोकेदुखी वाढल्यामुळे अयाज आणि त्याच्या साथीदाराला लवकरात लवकर न्यायालयीन कोठडी मिळावी आणि तो येथून लवकर बाहेर पडावा असे पोलिसांना वाटू लागले आहे.