पोलीस व्हॅनमधून पोक्सोच्या गुन्ह्यांतील एका आरोपीने पलायन केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात घडली. अविनाश हरिश्चंद्र यादव असे या आरोपीचे नाव असून चारकोप परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी अविनाशविरुद्ध चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात राहणार्या अविनाशचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधातून त्याने तिचे अपहरण केले होते, हा प्रकार तिच्या पालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी चारकोप पोलिसांत अविनाशविरुद्ध तक्रार केली होती.
हे ही वाचा:
जीएसटीमुळे अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन पर्यंत पोहोचेल
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचा राजीनामा
तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?
लसीकरणाचे तीनतेरा वाजवणारे आरोपी झाले १३
याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना त्याला पोलिसांनी अटक केली होती, यावेळी त्याच्या तावडीतून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने बुधवारी त्याला पुन्हा दिंडोशीतील विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार होते. त्यासाठी त्याला अॅण्टीजेन चाचणीसाठी नेण्यात आले होते. पोलीस व्हॅनमध्ये तो बेडीसह बसला होता. मात्र ही व्हॅन कांदिवलीतील एका सिग्नलजवळ थांबताच तो पोलिसांच्या हातावर झटका देऊन बेडीसह पळून गेला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून त्याच्या अटकेसाठी चारकोप पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.