शाहजहान शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

बसिरहाट न्यायालयासमोर हजर

शाहजहान शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

ईडी अधिकारी व केंद्रीय सशस्त्र पोलिस दलावरील (सीएपीएफ) हल्ल्याप्रकरणात अटक करण्यात आलेला तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख याच्यावर सीबीआयने हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्यावर ईडी अधिकारी आणि सीएपीएफ अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांसह तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

पश्चिप बंगालमधील उत्तर २४ परगणामधील बसिरहाट उपविभागीय न्यायालयात एफआयआर दाखल करण्यात आला. शुक्रवार, ८ मार्च रोजी सीबीआयने शाहजहान शेख याच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर रविवार, १० मार्च रोजी शाहजाहन याला सीबीआयचे कार्यालय असलेल्या कोलकात्यातील निझाम पॅलेस या कार्यालयातून बासिरहाट येथील उपविभागीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याचा ताबा देण्याबाबत न्यायालय निर्णय सुनावणार आहे. गेले १० दिवस शाहजहान पोलिस कोठडीत आहे. जानेवारीमध्ये ईडीचे अधिकारी शाहजहान याच्या घरावर छापा मारण्यास गेले असताना त्याने जमावाला अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यास उद्युक्त केले, अशी कबुली त्याने दिल्याचे समजते.

शाहजहान फरार झाल्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी संदेशखालीतील शेकडो महिला त्याच्या विरोधात रस्त्यांवर उतरल्या होत्या. या महिलांनी शाहजहान व त्याचे सहकारी शिबाप्रसाद हझरा आणि उत्तम सरदार यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच, जमिनी बळकावल्याचा आणि मजुरी न दिल्याचा आरोप केला होता.

हे ही वाचा:

मोबाइलच्या व्यसनाने घेतला जीव

क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!

कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!

ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे हावभाव बदलले!

काही महिलांनी तर शाहजहान याच्या मालमत्तेवर हल्ला केला होता तसेच शिबा प्रसाद हजारी याचे पोल्ट्री फार्म पेटवून दिले होते. तसेच, त्यांनी संदेशखाली पोलिस ठाण्याला घेराव घालून या तिघांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. यासाठी गावात तीन दिवस आंदोलन सुरू होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी संदेशखाली पोलिसांनी उत्तम सरदारला, १७ फेब्रुवारी रोजी शिबू प्रसाद हाझरा याला लैंगिक अत्याचाराप्रकरणी अटक केली होती. तर, २९ फेब्रुवारी रोजी शाहजहान शेख याला अटक करण्यात आली.

Exit mobile version